पुणे : नशा-पाणी करताना झालेल्या किरकोळ वादातून मित्राच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक मारून त्याचा खून केल्याची घटना भवानी पेठ परिसरात घडली. घटनेनंतर संशयित आरोपी स्वतः खडक पोलीस ठाण्यात हजर झाला. पोलिसांनी अजय ऊर्फ ‘चोर राजा’ सुखदेव शिंदे याला अटक केली आहे.

आकाश ऊर्फ अक्क्या विठ्ठल पाटोळे (वय ३०, रा. काशेवाडी, भवानी पेठ) असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी रुपाली प्रमोद पाटोळे यांनी खडक पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास भवानी पेठेतील वजन काट्याजवळील सोसायटीच्या गेटसमोर ही घटना घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची जुना मोटार स्टँड चौकात शेंगा आणि कणीस विक्रीची हातगाडी आहे. २ ऑक्टोबर रोजी सायंकाळी आकाश हा झोपेतून उठून अंघोळ करून घरी बसला होता. सायंकाळी सहाच्या सुमारास त्याचे मित्र शंभु आणि आबिद यांनी त्याला हाक मारून बाहेर बोलावले. त्यांच्यासोबत जात असल्याचे सांगून आकाश घरातून बाहेर पडला.

दरम्यान, रात्री साडेआठच्या सुमारास उमेर सलिम पठाण याने फिर्यादी यांना वजन काट्याच्या समोर असलेल्या सोसायटीच्या गेटजवळ आकाश रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे सांगितले. फिर्यादी घटनास्थळी पोहोचल्या असता आकाश बेशुद्ध अवस्थेत पडलेला होता. त्याच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक मारण्यात आल्याने गंभीर दुखापत झाली होती. पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेले. मात्र डॉक्टरांनी तपासणीपूर्वीच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले.
यानंतर फिर्यादी खडक पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेल्या. त्याचवेळी आकाशचा मित्र अजय ऊर्फ ‘चोर राजा’ शिंदे स्वतः पोलीस ठाण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार, अजयने आकाशसोबत नशा-पाणी करत असताना किरकोळ वाद झाल्याचे आणि त्यातून त्याच्या डोक्यात सिमेंटचा पेव्हर ब्लॉक मारल्याचे सांगितले. त्यानंतर आकाश रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडल्याने अजय तेथून निघून गेला. त्याने घरी जाऊन कपडे बदलले आणि पोलिस शोध घेत असतील या विचाराने स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाल्याचे पोलिसांनी सांगितले. खडक पोलिसांनी अजय शिंदे याला अटक केली असून, सहायक पोलीस निरीक्षक राकेश जाधव पुढील तपास करीत आहेत.






