लोणी काळभोर, (पुणे) : हवेलीची अस्मिता असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याची एक इंचही जमीन विक्री होऊ देणार नाही. राज्यातील सर्वच कारखान्यावर कर्ज आहेत. असा कोणताही कारखाना नाही ज्याच्यावर कर्ज नाही. त्यामुळे कारखान्याच्या संचालकांनी काढलेला जमीन विक्रीचा घाट आम्ही हाणून पाडणारच असा इशारा हवेलीचे ज्येष्ठ नेते व यशवंत कारखान्याचे माजी अध्यक्ष के.डी. बापू कांचन यांनी दिला आहे.
थेऊर (ता. हवेली) येथील मागील चौदा वर्षापासून बंद असलेल्या यशवंत सहकारी साखर कारखान्याची सुमारे 100 एकर जमीन विक्री करण्याचा प्रस्ताव पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीला दिला आहे. मात्र, यशवंतच्या 300 कोटी रुपयांच्या जमीन विक्रीला सभासदांनी विरोध केला आहे. यशवंतची वार्षिक सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. 26) होणार आहे. तत्पूर्वी कारखान्याचे सभासद व विरोधकांनी थेऊरफाटा (कुंजीरवाडी, ता. हवेली) येथील एका हॉटेलमध्ये पत्रकार परिषदेचे आयोजन सोमवारी (ता. 24) आयोजन केले होते. या पत्रकार परिषदेत के.डी. बापू कांचन बोलत होते.
यावेळी बाजार समितीचे माजी संचालक आप्पासाहेब काळभोर, भाजपा नेते कमलेश काळभोर, अजिंक्य कांचन, वाडेबोल्हाईचे माजी सरपंच दीपक गावडे, नायगावचे माजी प्रभारी सरपंच राजेंद्र चौधरी, कोरेगाव मूळचे माजी उपसरपंच लोकेश कानकाटे, शेतकरी संघटनेचे धनंजय काळभोर, सुर्यकांत काळभोर, निलेश काळभोर, अलंकार कांचन, सुरेश कामठे, राहुल चौधरी, सागर गोते, मारुती चौधरी, चंद्रकांत वारघडे, पूर्व हवेलीतील नेते व पत्रकार उपस्थित होते.
यावेळी भाजपा नेते कमलेश काळभोर म्हणाले, ” गेल्या वर्षी झालेली निवडणूक कारखान्याची जमीन विकायची नाही या मुद्द्यावरच लढवली गेली होती. जमीन न विकता कारखाना चालू करु असे आश्वासन सत्ताधारी गटाचे पॅनेल प्रमुख व उमेदवार प्रत्येक प्रचार सभेत देत होते. सभासदांची फसवणूक करून मते घेतल्याबद्दल सत्ताधाऱ्यांनी सभासदांची माफी मागितली पाहिजे. फक्त जमीन विकण्यासाठीच वार्षिक सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले आहे. मयत सभासदांच्या वारस नोंदी करून त्यांच्या वारसांना कारखान्याचे सभासद करण्याचे आश्वासन ही सत्ताधाऱ्यांनी पाळलेले नाही. मयत सभासदांची वारसदार मुले वार्षिक सर्वसाधारण सभेला येणार आहेत. तुम्ही त्यांना अडवू शकत नाहीत. वारसनोंद न करता मयत सभासदाच्या वारसाकडून वाढीव शेअर अनामत तुम्ही मागता, मग गेल्या वर्षभरात त्यांची वारसनोंद का केली नाही. कमिशन खाण्यासाठी तुम्ही जमीन विकत आहात का? असा आरोप कमलेश काळभोर यांनी केला.
अजिंक्य कांचन म्हणाले, “जमीन विक्री करणे हा एकमेव पर्याय नाही. सभासदांशी चर्चा करून वेगवेगळे चार पर्याय द्यावे. शेजारचा भीमा – पाटस भाडेतत्वावर दिला जाऊ शकतो व सुरू होऊ शकतो. तर मग आपला यशवंत का नाही. सभासदांनी जमीन विक्री न करता सर्व सभासदांशी चर्चा करून वेगवेगळे पर्याय द्यावेत. ज्यांना कारखाणा सुरु करायचा आहे. त्यांच्यासाठी वर्तमानपत्रात जाहिरात देऊन भाडेतत्वावर कारखाना सुरु करण्यासाठी द्यावा. परंतु विकणे हा पर्याय नाही. असेही कांचन म्हणाले.
यावेळी बोलताना कारखान्याचे माजी प्रभारी मुख्य वित्त आधिकारी राजेंद्र चौधरी म्हणाले, “मी कारखान्याकडे माहिती आधिकारात काही माहिती मागितली आहे. ती न मिळाल्यामुळे मी केलेल्या तक्रारी नंतर प्रादेशिक सहसंचालकांनी सदर माहिती तातडीने द्यावी असा आदेश कारखान्याला दिला आहे. तरीही कारखान्याने मी मागितलेली संपूर्ण माहिती दिलेली नाही. मध्यंतरी राज्य सरकारने थकहमीपोटी कोट्यवधी रुपये कारखान्याला दिले आहेत. हे पैसे कारखान्याच्या कुठल्याच कर्ज खात्यावर जमा झालेले दिसत नाहीत. तर हे पैसे गेले कुठे असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.