पुणे : पुणे जिल्ह्याचे कारभारी म्हणून नुकत्याच झालेल्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाव चर्चेत आले आहे. त्याचवेळी अजित पवार हे राज्याचे मुख्यमंत्री होण्याची शक्यता वाढलेली असल्याने आगामी काळात पुण्याच्या पालकमंत्री पदाची माळ आता कोणाच्या गळ्यात पडणार, हे लवकरच समोर येणार आहे.
पुण्याच्या पालकमंत्री पदामुळे पुणे महानगरपालिका आणि जिल्हा परिषदेवर वर्चस्व ठेवणे कायम शक्य असते. यापूर्वी जास्तीत जास्त वेळा पुण्याचे पालकमंत्रिपद अजित पवार यांनी भूषविले आहे. मधल्या काळात पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश बापट, विद्यमान तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भूषविले आहे. पालकमंत्री पदावर विराजमान झाल्यानंतर जिल्हा नियोजन समितीच्या कामकाजावर नियत्रंण ठेवणे हेसुद्धा शक्य असते. याशिवाय जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाच्या माध्यमातून जिल्हा नियोजन समितीवर कार्यकर्त्यांची वर्णी लावता येते. महायुती सरकारच्या काळात काही दिवस चंद्रकांत पाटील यांचे हे पद होते. मात्र, अजित पवार यांनी आग्रह धरल्याने त्यांना हे पद देण्यात आले होते.
मागील अडीच वर्षांत अजित पवार यांनी पालकमंत्री पदावर काम करताना मोठ्या प्रमाणात विकासकामे केल्याने त्यांनी पुणे जिल्ह्याचे कारभारी म्हणून या निवडणुकीत मान मिळविला आहे. पुणे जिल्ह्यात अजित पवार यांनी ९ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे पालकमंत्री पदावर अजित पवारांचा दावा या वेळी कायम राहणार आहे. मात्र, ऐनवेळी महायुतीमध्ये काही वेगळा निर्णय झाला, तर पुणे जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी ही चंद्रकांत पाटील यांच्याकडे येऊ शकते. आगामी काळात पुणे महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिकांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पद आपल्या ताब्यात असणे गरजचे असल्याचे मानले जात आहे.