पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या तयारीच्या दृष्टीने महायुतीची समन्वय बैठक सोमवारी होणार आहे. कोथरूडचे आमदार, राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक होणार आहे. महायुतीतले सर्व घटक पक्ष या बैठकीला हजर राहणार आहेत.
भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, लोकजनशक्ती पक्ष, शेतकरी संघटना, शिवसंग्राम आणि महायुतीतील अन्य घटक पक्षांचे प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसोबत चंद्रकांत पाटील चर्चा करणार आहेत.
आगामी लोकसभा निवडणुकीची महायुतीकडून तयारी सुरू झाली आहे. या तिन्ही जागा मोठ्या मताधिक्याने निवडून आणण्याचा निर्धार महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. काही दिवसांपूर्वी महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांचा मेळावा झाला होता. त्यानंतर आता महायुतीच्या समन्वय समितीच्या पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक होणार आहे.
पुणे, बारामती आणि शिरूर लोकसभा मतदारसंघासाठीची रणनीती या बैठकीत निश्चित केली जाणार आहे. त्यादृष्टीने बारामती, पुणे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या क्लस्टरचे प्रमुख चंद्रकांत पाटील उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत. महायुतीमधील सर्व प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आज दुपारी बारा वाजल्यापासून पुण्यातील भाजप मुख्य कार्यालयात बैठकीचे आयोजन केले आहे. सायंकाळपर्यंत ही बैठक चालणार आहे.