पिंपरी: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याच्याबाबत नवनवे खुलासे पुढे येत आहेत. त्यातच कराडचा वाकडमधील एका उच्चभ्रू सोसायटीत फ्लॅट असून त्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सुमारे १ लाख ५५ हजार रुपयांचा कर थकवल्याची माहिती समोर आली आहे. करसंकलन विभागाने जप्तीची नोटीस बजावूनही कराचा भरणा न केल्यामुळे हा फ्लॅट जप्त करण्याची कारवाई केली जाणार असल्याचे समजताच ऑनलाईन दंड भरण्यात आला.
वाल्मिक कराड यांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आणि संपत्तीबाबत अनेक खुलासे समोर येत आहेत. त्यातच पुणे शहरानंतर पिंपरी -चिंचवड शहरात देखील वाल्मिक कराड आणि त्याच्या पत्नीच्या नावे असलेली संपत्ती समोर आली. वाकडमधील पार्क स्ट्रीट सोसायटीच्या आयव्हरी इमारतीच्या ६ व्या मजल्यावर ६०१ नंबरचा ३.१५ कोटींपेक्षा अधिक किमतीचा ४ बीएचके फ्लॅट त्याच्या नावे आहे. धक्कादायक बाब म्हणजे कराडने या फ्लॅटचा पिंपरी-चिंचवड महापालिकेचा मिळकत कर न भरल्यामुळे कर संकलन विभागाने त्याच्या या फ्लॅटला नोटीससुद्धा लावली आहे. पार्क स्ट्रीट या उच्चभ्र सोसायटीतील वाल्मिक कराडच्या फ्लॅटवर जप्तीची कारवाई होणार असून तो सील केला जाणार आहे. नंतर कर न भरल्यास नियमानुसार त्याचा लिलाव केला जाणार आहे.
१६ जून २०२१ ला वाल्मिक कराड आणि पत्नी मंजली वाल्मिक कराडच्या नावे या फ्लॅटची नोंदणी झालेलो आहे. मात्र तेव्हापासून वाल्मिक कराडने मिळकत कर थकवला आहे. १ लाख ५५ हजार ४४४ रुपयांचा हा मिळकत कर थकवल्याप्रकरणी पिंपरी-चिंचवड महापालिकेने वाल्मिक कराडला नोटीस पाठवली आहे. २१ नोव्हेंबर २०२४ ला धाडलेल्या नोटिशीनंतरही कर न भरल्याने आता हा फ्लॅट सील केला जाईल आणि त्यानंतर त्याचा लिलावही करण्यात वेईल अशी माहिती आहे.
मिळकत कर संबंधीचे बिल महापालिकेने यापूर्वीच त्याला बजावलेले आहे. मिळकत कराबरोबरच त्याची एक लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे. त्याला आपण जप्तीपूवींची नोटीस देखील दिलेली आहे, त्याच्याकडे साधारण १ लाख ५५ हजार ४४४ इतकी थकबाकी आहे. त्याप्रमाणे जप्ती अधिपत्र दिलेले आहे. पालिकेकडे १६ जून २०२१ ला या मालमत्तेची नोंद झाली असून तेव्हापासून त्याच्याकडे मालमत्ता कर थकीत आहे. ही मालमत्ता सील करून पुढील लिलावाची प्रक्रिया केली जाईल.
अविनाश शिंदे, सहाय्यक आयुक्त, पिंपरी-चिंचवड महापालिका