लोणी काळभोर : अयोध्येत येत्या २२ जानेवारीला श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना होत आहे. त्यानिमित्त लोणी काळभोर (ता. हवेली) येथे तीन दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. श्री काळभैरव अंबरनाथ सर्व देवस्थान ट्रस्टच्या वतीने श्री रामलल्ला प्राणप्रतिष्ठापणा सोहळ्या निमित्त रामायण, भजन, हरिपाठ, हनुमान चालीसा पठण, संगीतमय सुंदरकांड, रांगोळी, मिरवणूक, महाआरती, महाप्रसाद व दीपोत्सव आदी कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.
लोणी काळभोर गावातील राम मंदिरात शनिवारी (ता.२०) सकाळी ९ ते १२ दरम्यान श्रीराम मंडळ रामायण सादर करणार आहे. दुपारी १२ ते २ दरम्यान श्रीमंत अंबरनाथ महिला भजनी मंडळाचे भजन, दुपारी २ ते ५ दरम्यान श्रीराम महिला भजनी मंडळाचे भजन होणार आहे. ५ ते ६ हरिपाठ, ६ ते ८ रामाकृषी भजनी मंडळाचे भजन होणार आहे. ८ ते १० दरम्यान राजस्थानी युवा संघाच्या वतीने हनुमान चालीसा पठण होणार आहे.
रविवार (ता.२१) सकाळी ९ ते १२ दरम्यान श्रीराम मंडळाच्या वतीने रामायण सादर होणार आहे. दुपारी १२ ते ५ दरम्यान श्रीमंत अंबरनाथ रामदरा शिवालय प्रासादिक दिंडी व शंकर महाराज बाल भजनी मंडळ, भोसले नाना महिला भजनी मंडळ व तुकाई माता महिला भजनी मंडळाचे भजन होणार आहे. संध्याकाळी ५ ते ६ दरम्यान हरिपाठ व ६ ते ८ दरम्यान रायवाडी भजनी मंडळाचे भजन होणार आहे. रात्री ८ ते १० दरम्यान राजस्थानी युवा संघाच्या वतीने हनुमान चालीसा पठण होणार आहे.
लोणी काळभोर गावातील महिला भगिनी सोमवारी (ता.२२) संपूर्ण गावठाणातील रस्त्यांवर रांगोळी काढणार आहेत. सकाळी ८ ते ११ दरम्यान गावातील दत्तमंदीर ते तीर्थक्षेत्र रामदरा दरम्यान प्रभु रामाची भव्य मिरवणूक काढण्यात येणार आहे. तीर्थक्षेत्र रामदरा शिवालयात दुपारी १२ वाजता महाआरती होणार असून, त्यानंतर भाविक भक्तांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे. सायंकाळी ६ ते ८ दरम्यान गावातील सर्व मंदिरांमध्ये दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा सर्व भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन लोणी काळभोर ग्रामस्थांनी केले आहे.
दरम्यान, २० ते २२ जानेवारी या दिवशी तीर्थक्षेत्र रामदरा येथील मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी सकाळी ७ ते रात्री १० यावेळेत खुले राहणार असून, सायंकाळी ५ वाजेपर्यंत भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे, अशी माहिती तीर्थक्षेत्र रामदरा येथील महंत हेमंतपुरी महाराज यांनी दिली.
दत्त मंदिरापासून निघणार भव्य पारंपारिक मिरवणूक
लोणी काळभोर येथील दत्त मंदिरापासून सोमवारी (ता.२२) सकाळी आठ वाजता देवतांची भव्य मिरवणूक पारंपारिक पद्धतीने घणार आहे. ही मिरवणूक सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास रामदरा शिवालय येथे पोहोचणार आहे. मिरवणूक रामदरा येथे पोहचल्यानंतर रामदरा शिवालयाच्या वतीने भव्य स्वागत करण्यात येणार आहे. श्री रामलल्लाची प्रतिष्ठापना सोहळा सोमवारी दुपारी 12 वाजून ५० मिनिटांनी संपन्न होणार असून, यावेळी सर्व भाविक अक्षदा वाहतील. तर सायंकाळी सहा ते रात्री आठपर्यंत रामदरा शिवालय व लोणी काळभोरमधील सर्व मंदिरात दीपोत्सव होणार आहे.