उरुळी कांचन: जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत प्रवेश केल्यांनतर परंपरेनुसार पालखी सोहळा गावात नेण्यासाठी ग्रामस्थांनी तो महामार्गावरच बुधवारी (ता. 0३) सव्वा एक वाजण्याच्या सुमारास रोखला. यावेळी उरुळी कांचन ग्रामस्थ, पालखी सोहळा विश्वस्त व पोलीस प्रशासनात अभूतपूर्व गोंधळ पाहायला मिळाला. ग्रामस्थ व पालखी सोहळ्याच्या या वादामध्ये 60 वर्षाची परंपरा मोडली आहे. तर पालखी सोहळ्याचा ग्रामस्थांनी निषेध करून विश्वस्तांचा धिक्कार केला.
जगद्गुरु संत तुकाराम महाराज पालखी सोहळा कदमवाकवस्ती येथील मुक्काम आटोपून बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाला. थेऊरफाटा, कुंजीरवाडी, नायगाव फाटा, सोरतापवाडी, इनामदार वस्ती येथील ग्रामस्थांच्या शुभेच्छा घेत पालखी सोहळा उरुळी कांचन येथे पोहचला. यावेळी ग्रामस्थांनी महामार्गावरच थांबून पालखी सोहळ्याचा नगारा अडविला. यावेळी हवेलीचे जेष्ठ नेते के.डी. कांचन, सरपंच अमित कांचन, माजी सरपंच संतोष कांचन, माजी सरपंच भाऊसाहेब कांचन, राजेंद्र कांचन, दत्तात्रय कांचन, बाजार समितीचे संचालक राजाराम कांचन, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य अलंकार कांचन, शंकर बडेकर, माजी उपसरपंच युवराज कांचन यासह हजारो ग्रामस्थ उपस्थित होते.
पालखी सोहळ्याचा दुपारचा विसावा हा परंपरेनुसार ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिरात करावा, अशी विनंती ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याच्या प्रमुखांना केली. मात्र, पालखी विश्वस्त ठरलेल्या वेळापत्रकानुसार पालखी सोहळा पुढे नेण्याच्या तयारीत होते. यावेळी ग्रामस्थ, पालखी सोहळा विश्वस्त व प्रशासन यांच्यात मोठ्या प्रमाणात ओढाओढी सुरु झाली. यावेळी पोलिसांनी मध्यस्थी केली. मात्र, मध्यस्थी करीत असताना पालखी सोहळ्यातील पदाधिकाऱ्याने एका पोलीस अधिकारी व काही कर्मचाऱ्यांवर हात उचलला असल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.
पालखी उरुळी कांचन येथील जुन्या इलाईट चौकातून पुढे गेली असता ग्रामस्थांनी पालखी प्रमुख व विश्वस्तांचा निषेध केला, तसेच मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केली. यावेळी पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी मध्यस्थी करून ग्रामस्थांची समजूत काढली. त्यानंतर पालखी सोहळा हा ठरलेल्या वेळापत्रकानुसार उरुळी कांचन येथील विसाव्याला न थांबता थेट यवतच्या दिशेने मार्गस्थ झाला. ग्रामस्थ व पालखी सोहळ्याच्या या वादामध्ये ६० वर्षाची परंपरा मोडली आहे. त्यामुळे हा वाद आणखीन चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
वारकरी संप्रदायाच्या वैष्णवांचा मेळा हा गेल्या 339 वर्षांपासून देहू ते पंढरपूर असा चालत जातो. तो मार्गस्थ होत असताना वेगवेगळ्या गावातून, वाड्या वस्त्यांवरून जात असतो, या मार्गातील वैष्णवांना तुकाराम महाराजांबरोबर विठ्ठलाच्या दर्शनाचा लाभ घेता येतो. त्यानुसार या पालखी सोहळ्याच्या प्रवासाचा तपशीलवार कार्यक्रम श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे यांनी जाहीर केला आहे. यामध्ये त्यांनी उरुळी कांचन येथील विसाव्याच्या संदर्भात बदल केले होते. त्यामध्ये दुपारचा विसावा ग्रामदैवत काळभैरवनाथ मंदिराऐवजी पालखी मार्गावरच म्हणजे पुणे-सोलापूर महामार्गावरच विसावा केला.
पालखी सोहळा सुरळीतपणे उरुळी कांचन गावात आश्रम रोडने, मारुती मंदिरात जाऊन अभिषेक पुजा व आरती स्वीकारून पुढील यवत मुक्कामासाठी महात्मा गांधी विद्यालय रस्त्याने सोलापूर रोडला लागून पुढे जात होता. मात्र, २०२३ पासून विश्वस्तांनी वेगळी भूमिका घेत उरुळी कांचन ग्रामस्थांचा शांतीपूर्ण मार्गाने सर्व सोईसुविधांयुक्त असा विसावा टाळण्याचा किंवा उरुळी कांचन वासियांना वेठीस धरण्याचा प्रकार करीत आहेत, असा आरोप करत उरुळी कांचन ग्रामस्थांनी पालखी सोहळ्याला असहकार करण्याचा पवित्रा घेतला होता.
वारकरी उपाशी..
पालखीबरोबर चालत निघालेले काही वारकरी हे दरवर्षी असलेल्या ठिकाणी विसाव्यासाठी जातात. मात्र, पालखी न थांबल्याने वारकऱ्यांना उपाशी राहावे लागले आहे. ग्रामस्थांकडून पालखीबरोबर असलेल्या वारकऱ्यांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. परंतु, पालखी प्रमुखांनी पालखी मार्गात केलेल्या बदलामुळे वारकऱ्यांना उपाशी जावे लागले.
दिंड्या गावात, पालखी यवतकडे
पालखी प्रमुख व विश्वस्त यांनी दिंडी प्रमुखांना पालखी उरुळी कांचन या ठिकाणी थांबणार नसल्याची कोणतीही कल्पना न दिल्यामुळे वारकरी थेट आश्रम रोडने गावात गेले. तर पालखी थेट यवतच्या दिशेने मार्गस्थ झाली. यामुळे दर्शनासाठी महात्मा गांधी विद्यालयाच्या मैदानावर थांबलेले भाविक हिरमुसले व दर्शन न घेताच माघारी फिरले.
याबाबत बोलताना उरुळी कांचनचे माजी सरपंच संतोष कांचन म्हणाले, “उरुळी कांचन येथील काही नागरिकांनी पालखी गावात नेण्याची विनंती केली. त्यावेळी माणिक मोरे म्हणाले की, उरुळी कांचन ग्रामस्थांनी ग्रामसभा घेऊन हा मुक्काम उरुळी कांचन गावाबाहेर जाऊ नये, असा ठराव लेखी स्वरूपात जिल्हा अधिकारी यांना द्यावा. तरच गावात पालखी आणायची का नाही? याचा निर्णय घेईल, अशी भाषा मोरे वापरत आहेत. शासनाचा पैसा आहे. तुम्ही मानकरी म्हणून रहा, मालक म्हणून राहू नका. हा सर्वसामान्य जनतेचा पैसा शासन खर्च करत आहे. हा पैसा जनतेचा आहे. तुमचा नाही. तुमचा पैसा खर्च करा व तुमची पालखी कोठूनही घेऊन जा. माणिक मोरे महाराज यांनी एक लाख लोकांना दर्शनापासून वंचित ठेवले आहे.