उरुळी कांचन, (पुणे) : पेठ (ता. हवेली) येथील साई इंटरप्रायझेस सिमेंट पाईप कंपनीसह दोन अन्य सिमेंट कंपन्यांतून सुमारे 47 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. मंगळवारी (ता. 26) मध्यरात्री 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान ही घटना घडली. या घटनेत मात्र चोरीच्या घटनेतील रिक्षा व एक मोबाईल फोन पोलिसांच्या हाती लागला आहे.
याप्रकरणी सचिन भाऊसाहेब हाके यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चार ते पाच चोरट्यांवर उरुळी कांचन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन भाऊसाहेब हाके व साथीदार नवनाथ दत्तात्रय वायकर (रा. कुंजीरवाडी) या दोघांनी पेठ येथील विष्णु चौधरी यांच्या मालकीची साई इन्टरप्रायझेस नावाची सिमेंट पाईप तयार करण्याची कंपनी दोघांनी भाडयाने घेतली आहे. मंगळवारी सायंकाळी पाच वाजता कंपनीत जावुन कामगारांनी केलेल्या कामाची पाहणी केली व कंपनीत सिमेंट पाईप तयार करण्यासाठी लागनारे पाईप, लोखंडी रींग, लोखंडी साखळीमध्ये बांधुन ठेवल्या होत्या.
रात्री दीड वाजण्याच्या सुमारास प्रज्वल हाके याने सचिन हाके यांना फोन करून माहिती दिली की, शेतात फुलांच्या पिकास पाणी धरत असून तुझ्या कंपनीजवळ एक रीक्षा थांबलेली आहे. चार ते पाच लोक उतरून कंपनीतुन पाईप मोल्डची चोरी करीत आहेत. यावेळी कंपनजवळून एक रीक्षा उरूळी कांचन गावाच्या बाजूला जाताना दिसून आली.
यावेळी हाके यांनी दुचाकी आडवी लावली. यावेळी रिक्षातील दोघेजण उतरून पळून गेले. तसेच रिक्षा थांबवण्याचा प्रयत्न केला असता रिक्षा पलटी झाली. यावेळी चालक व आणखी एकजण त्या ठिकाणावरून पळून गेले. सदरची माहिती पोलिसांना दिली. यावेळी कंपनीतील लेबर व आजुबाजुचे लोक जमा झाले होते. यावेळी त्या ठिकाणी चोरट्यांचा राहीलेला व्हिओ कंपनीचा मोबाईल फोन व रिक्षा पोलिसांनी जप्त केली.
दरम्यान, शेजारी असलेले रामहारी दगडु कदम (रा. पेठ) यांनी येवुन त्यांच्या सागर सिमेंट प्रोडक्ट या सिमेंट कंपनीतील बायडींग ताराचे सात बंडल चोरीस गेलेचे सांगीतले आहे. नायगाव मार्ग वस्ती येथील सुचीता स्पन पाईप या सिमेंट पाईप कंपनीतील 8 इंची 2 व 6 इंची 2 रींगा चोरीला गेल्याची माहिती दिली. तसेच सुचीता सुरेश चौधरी रा. नायगाव यांच्या कंपनीतील सिमेंट पाईप तयार करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी रिंग्स व बायडिंग तारांचे बंडल असा 47 हजार 925 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याप्रकरणी अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास उरुळी कांचन पोलीस करीत आहेत.