वाघोली, (पुणे) : वाघोली परिसरात गस्त घालत असलेल्या गुन्हे शाखा युनिट 6 च्या पथकाने दुचाकी चोरी प्रकरणी एका इसमाला अटक केली आहे. त्याच्याकडून अंदाजे 70 हजार रुपये किमतीची दुचाकी जप्त करण्यात आली आहे. योगेश युवराज भोसले (वय 40, रा. वाघोली, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी (ता. 05) युनिट 6 चे पोलीस कर्मचारी खांदवे नगर, वाघोली येथे गस्त घालत असताना एका संशयास्पद दुचाकीसह व्यक्तीला थांबवून विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे त्यास वाघोली येथील कार्यालयात आणून अधिक चौकशी केली असता, संबंधित दुचाकी बाबत अलंकार पोलीस ठाणे येथे गु.र.क्र. 126/2024, भादंवि कलम 379(2) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे निष्पन्न झाले.
त्याच्याकडे चौकशी केली. तसेच तपासात आरोपी हा चोरी करताना सीसीटीव्ही फूटेजमध्ये आढळून आल्याचे स्पष्ट झाले. त्याच्याकडील हिरो होंडा स्प्लेंडर प्लस दुचाकी पोलिसांनी जप्त केली आहे. आरोपीस व जप्त दुचाकीस पुढील कारवाईसाठी अलंकार पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाई पोलीस उपआयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे व सहाय्यक पोलीस आयुक्त (गुन्हे-2), राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्यांच्या पथकाने केली.