पुणे : पुण्यातील प्रसिद्ध दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशाअभावी उपचार करण्यास नकार दिल्यामुळे २९ मार्च रोजी झालेल्या दुर्दैवी घटनेत तनिषा भिसे (वय २७) या सात महिन्यांच्या गर्भवती महिलेचा मृत्यू झाला. याबाबत राज्य शासनाच्या तीन समिती चौकशी करीत होत्या. यापैकी राज्य आरोग्य विभागाचा आणि पुणे धर्मादाय आयुक्तांचा अहवाल यापूर्वीच सादर करण्यात आला आहे. या दोन्ही अहवालात दीनानाथ रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. आता पुणे महापालिकेच्या, माता-मृत्यू विभागाचा अहवाल सादर करण्यात आला आहे.
राज्य महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली होती. आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी माता मृत्यू अन्वेषण समितीकडून चौकशी होणार आणि त्यांचा सुद्धा अहवाल येणार असल्याचे सांगितले होते. शुक्रवारी (दि. ११ एप्रिल) पुणे महापालिकेच्या माता-मृत्यू अन्वेषण समितीचा अहवालही प्रशासनास सादर करण्यात आल्याची माहिती रूपाली चाकणकर यांनीच आपल्या एक्स या हँडलवरून दिली आहे.
रूपाली चाकणकर म्हणाल्या की, तनिषा भिसे यांच्या मृत्यूप्रकरणातील दोन्ही चौकशी अहवालावर दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर ठपका ठेवण्यात आला आहे. त्यामुळे राज्य शासनाने दोन्ही अहवालाच्या अनुषंगाने तातडीने कारवाई करावी. याप्रकरणी राज्याचे आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिशन पवार यांच्या चार सदस्यांच्या समितीने आपल्या आहवालात रुग्णालयावर ठपका ठेवला होता. त्यानंतर पुणे धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांनी देखील आपला आहवाल सादर करत दीनानाथ मंगेशकर रुग्णालयावर धर्मादाय रुग्णालयाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवला आहे.
पुणे सह धर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर यांच्यासह यमुना जाधव आणि इतर तीन अशा एकूण पाच सदस्यांचा या समितीत समावेश होता. तर पुणे महापालिकेच्या माता मृत्यू विभागाने आपला आहवाल राज्य शासनाला आज सादर केला आहे. त्यामुळे राज्य सरकार आता दीनानाथ रुग्णालयावर काय कारवाई करणार याकडे लक्ष लागले आहे.