पुणे: व्होडाफोन कंपनीच्या ५४ लाखाच्या लाईनकार्डची चोरी झाल्याची धक्कादायक घटना स्वारगेट येथील वेगासेंटर चौकात मंगळवारी (ता.१६) घडली होती. या गुन्ह्याचा अवघ्या आठ दिवसांच्या आत छडा लावून तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर चोरीचा माल दिल्लीतून हस्तगत करण्यास पोलीसांना यश आले आहे. स्वारगेट पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरी सर्वत्र कौतुक होत आहे.
भरमु बिरप्पा पुजारी (वय ३९, धंदा सिक्युरिटी गार्ड रा. गुरूकृपा बिल्डींग रुमनं ०३, लिपाणे वस्ती, जांभुळवाडी रोड, कात्रज-पुणे), दिपक मुरलीधर तडके (वय ४८ धंदा टेक्नीशियन रा. शांती रक्षक सोसायटी सी विंग फ्लॅट नं ४७, नागपुर चाळ येरवडा, पुणे) व प्रितमकुमार कामताप्रसाद कमल (वय ३२ धंदा केबलिंग रा. रोहिदास निवास, पहिला मजला कोल्हेवाडी, खडकवासला, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी स्वारगेट येथील व्होडाफोन कंपनीच्या ऑफिसमधून ५४ लाख ५४ हजार रुपयांचे लाईनकार्ड चोरी झाल्याची तक्रार स्वारगेट पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सदर गुन्हा उघडकीस आणून आरोपींना पकडण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्वारगेट पोलिसांना दिल्या होत्या. त्यानुसार स्वारगेट पोलिसांनी आरोपींना पकडण्यासाठी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे व त्यांच्या सहकाऱ्यांचे पथक तयार केले होते.
सदर गुन्ह्याचा तपास करीत असताना पथकाने स्वारगेट येथील व्होडाफोन कंपनीचे ऑफीस व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, कंपनीतील कामगार यामध्ये सहभागी असल्याचे दिसून आले. पोलिसांनी कामगारांकडे कसून चौकशी केली असता, सदर लाईनकार्ड कामगारांनीची चोरी केल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी आरोपी भरमु पुजारी व दिपक तडके यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली. त्यानंतर आरोपींनी वरील गुन्ह्याची कबुली पोलिसांना दिली आहे.
दरम्यान, दोन्ही आरोपींनी चोरीचे लाईनकार्ड हे प्रितमकुमार कमल यांना दिल्याचे पोलिसांच्या तपासात निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांनी लाईन कार्ड हे दिल्ली येथुन ताब्यात घेऊन जप्त केले. पोलिसांनी मोठ्या शिताफीने चोरीचा गुन्हा उघड करून तीन जणांना अटक केली आहे. स्वारगेट पोलिसांच्या या धडाकेबाज कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
सदरची कामगिरी पुणे शहर परिमंडळ २ च्या पोलीस उप-आयुक्त स्मार्तना पाटील, स्वारगेट विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त नंदिनी वग्यानीयांच्या मार्गदर्शनाखाली स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप फुलपगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत संदे, पोलीस उप निरीक्षक येवले, पोलीस अंमलदार संदीप घुले, सोमनाथ कांबळे, अनिस शेख, शिवा गायकवाड, फिरोज शेख, रमेश चव्हाण, दिपक खंदाड व प्रविण गोडसे यांच्या पथकाने केली आहे.