उरुळी कांचन, (पुणे) : पुणे-सोलापूर महामार्गावरील नामांकित विजय ट्रेडर्स नावाच्या किराणा दुकानाचे शटर अज्ञात चोरट्यांनी उचकटल्याची घटना घडली आहे. या घटनेत दुकानातील सिगारेट बॉक्स, विलायची, काजू, काजू तुकडा, बदाम, मगज बी असा तब्बल 3 लाख 86 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला. उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत शनिवारी (ता. 08) रात्री साडेनऊ ते रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.
याप्रकरणी दुकानाचे मालक विजय गुरुदास चावला (वय 41, व्यवसाय- किराणा दुकान, रा. स्वरगंधा सोसायटी, उरुळी कांचन) यांनी उरुळी कांचन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरोधात उरुळी कांचन पोलीस ठाण्यात भा.दं.सं. 334(1), 305 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
उरुळी कांचन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे -सोलापूर महामार्गावर विजय चावला यांच्या मालकीचे विजय ट्रेडर्स हे किराणा दुकान आहे. शनिवारी (ता. 08) रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास दुकान बंद करून चावला हे घरी गेले होते. रात्री साडेनऊ ते रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत दुकान बंद होते.
रविवारी सकाळी दुकान उघडण्याच्या वेळेस दुकानाचे शटर हे उचकटल्याचे दिसून आले. यावेळी दुकानात जाऊन पाहणी केली असता दुकानातील सिगारेट बॉक्स, विलायची, काजू, काजू तुकडा, बदाम, मगज बी हे त्यांच्या जागेवर असल्याचे दिसून आले नाही. यावरून दुकानात चोरी झाल्याचे निष्पन्न झाले. सदर ठिकाणी उरुळी कांचन पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शंकर पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे, पोलीस उपनिरीक्षक प्रवीण कांबळे व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.
दरम्यान, या घटनेत चोरट्यांनी सिगारेट बॉक्स, विलायची, काजू, काजू तुकडा, बदाम, मगज बी असा 3 लाख 86 हजार 500 रुपयांचा मुद्द्माल चोरून नेल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सीसीटीव्ही फूटेज आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने सहाय्यक पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी तपास सुरू केला आहे.