थेऊर, (पुणे) : अष्टविनायकापैकी एक असलेल्या थेऊर (ता. हवेली) येथील चिंतामणीच्या मंदिरावर चढून एका मनोरुग्ण असलेल्या तरुणाने आरडा-ओरड करत तुफान गोंधळ घातला. तीन तासांपैकी अधिक वेळ चाललेल्या या गोंधळाने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. गुरुवारी (ता. 14 ) सकाळी ही घटना घडली आहे. या घटनेचे व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाले आहेत.
संदीप पोपट गायकवाड, भिल्ल वस्ती, थेऊर, ता. हवेली असे गोंधळ घालणाऱ्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीड जिल्ह्यातील आष्टी येथील संदीप गायकवाड हा तरुण मनोरुग्ण आहे. मागील अनेक दिवसांपासून संदीप हा त्याच्या बहिणीकडे राहत आहे. बुधवारी थेऊर येथील चिंतामणीच्या मंदिरात भाविक दर्शनासाठी आले होते. यावेळी सदरचा मनोरुग्ण तरुण हा मंदिर परिसरात आला होता. यावेळी त्याला सुरक्षारक्षकांच्या मदतीने मंदिरात गोंधळ घालीत असल्याने बाहेर काढण्यात आले होते.
यावेळी मंदिराच्या बाहेर काढल्यानंतर संदीप याने मंदिराच्या बाहेरून चिंतामणी मंदिराच्या सभामंडपवार चढला. यावेळी मंदिरातील सुरक्षारक्षक व त्याठिकाणी असलेल्या मंदिरातील व्यक्तींनी संदीपला खाली घेण्यासाठी मोठे प्रयत्न केले. मात्र दोन ते तीन तास झाले तरी तरुण खाली आला नाही. उलट सभामंडप व परिसरात फुटलेली कौलारे घेऊन भाविकांना उभा राहून मारू लागला.
दरम्यान, सदर घटनेची माहिती लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली. त्याला पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना पाहून त्याने कौलारे मारण्यास सुरू केली. तो पोलिसांनाही आवरत नसल्याने मार्शलला बोलविण्यात आले. यावेळी लोणी काळभोर पोलीस, मंदिरातील सुरक्षारक्षक व भाविकांच्या तीन तासांच्या अथक प्रयत्नानंतर त्याला खाली घेण्यात आले. त्यानंतर त्याला पोलिसांनी पकडले. त्याला पाहण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी केली होती.
याबाबत बोलताना चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त केशव विद्वंस म्हणाले की, चिंतामणीचे मंदिर हे दर्शनासाठी सर्वांसाठी खुले करण्यात आलेले आहे. यावेळी प्रत्येक भक्ताला दर्शन देण्यासाठी देवस्थान ट्रस्ट काळजी घेत आहे. त्यासाठी ठिकठिकाणी सुरक्षारक्षकांची नेमणूक करण्यात आलेली आहे. यावेळी दर्शनाला येणारे भाविकही ओळखणे कठीण आहे. सदरचा मनोरूग्ण हा बाहेरच्या बाजूने मंदिरावर चढला होता. पोलिसांना निवेदन देऊन मंदिर परिसरात कायमस्वरूपी एक पोलीस देण्याची मागणी करण्यात येणार आहे.