लोणी काळभोर (पुणे)- मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन लोणी काळभोर गाव ते रामदरा, लोणी कंद ते डोंगरगाव या पुर्व हवेलीमधील दोन प्रमुख रस्त्यांसह, शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील अठराहुन अधिक रस्त्यांच्या कामासाठीचा निधी हा पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात दादा पाटील, आमदार राहुल कुल यांच्या पाठपुराव्यामुळे मंजुर झालेला आहे. मात्र शिरुरचे आमदार अशोक पवार त्याचे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करीत आहेत. दुसऱ्यांनी पाठपुरावा केलेल्या विकास कामांचे फुकटचे श्रेय घेऊ नये असा उपरोधक टोला जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आमदार अशोक पवार यांचे नाव न घेता जोरदार लगावला आहे
लोणी काळभोर गाव ते रामदरा या रस्त्याच्या कामासाठी मिळालेला निधी हा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मिळालेला असताना, संबधित कामांच्या भुमिपुजन पत्रिकेत अथवा फ्लेक्सवर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री अथवा पालकमंत्री यांचे फोटो न छापणे हा प्रकार अत्यंत चुकीचा असल्याची टीकाही प्रदीप कंद यांनी केली आहे. तसेच या कामाचे भुमिपुजन करताना, शासकीय प्रोटोकॉल न पाळणाऱ्या अधिकाऱ्यांच्या विरोधात पालकमंत्री चंद्रकात दादा पाटील यांच्याकडे तक्रार करणार असल्याचेही प्रदीप कंद यांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन मंजुर झालेल्या लोणी काळभोर गाव ते रामदरा या रस्त्याच्या कामाचे भुमिपुजन आज (शनिवारी) होणार आहे. या भुमिपुजन पत्रिकेत शासकीय प्रोटोकॉल पाळला न गेल्याने, भारतीय जनता पक्षाने या कार्यक्रमावरुन टीकेची झोड उठवली आहे. याबाबत प्रतिक्रिया देतांना जिल्हा परीषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद यांनी आमदार अशोक पवार यांचे नाव न घेता, कंद यांनी पवार यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे.
याबाबत “पुणे प्राईम न्यूज”शी बोलताना प्रदीप कंद म्हणाले, शिरुर-हवेली मतदारसंघातील रस्त्यांच्या कामासाठी भरीव निधी मिळण्यासाठी प्रशासनाकडे वेळोवेळी पाठपुरावा केला जात आहे. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतुन लोणी काळभोर गाव ते रामदरा, लोणी कंद ते डोंगरगाव या पुर्व हवेलीमधील दोन प्रमुख रस्त्यांसह, शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघातील अठराहुन अधिक रस्त्यांच्या कामासाठी एकतीस कोटीहुन अधिक रुपयांचा निधी मिळालेला आहे. हा निधी मिळवण्यासाठी लोणी काळभोर, लोणी कंदसह विविध ग्रामपंचायतीचे सरपंच व इतर पदाधिकाऱ्यांनी प्रयत्न केलेले आहेत. मात्र विद्यमान लोकप्रतिनिधी हे श्रेय स्वतःचे आहे हे दाखवण्यासाठी स्वतःच्या अधिकारात सदर कामांचे भुमिपुजन तो पण शासकीय प्रोटोकॉल टाळून करण्याचा प्रयत्न करत आहेत.
प्रदीप कंद पुढे म्हणाले, जिल्ह्यात रस्त्यांची सर्वत्र मोठी मागणी आहे, राज्यात सरकार आपले आहे, शिरुर-हवेली मतदारसंघातील विविध कामांच्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळवण्यासाठी आमदार राहुलदादा कुल, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे, जेष्ठ नेते रोहीदास उंद्रे, राहुल पाचर्णे, हवेलीचे माजी अध्यक्ष संदीप अप्पा भोंडवे, भारतीय जनता पक्षाचे शिरुरचे विद्यमान अध्यक्ष आबासाहेब सोनवणे, हवेलीचे अध्यक्ष शामराव गावडे, दोन्ही तालुक्यातील आजी- माजी पदाधिका-यांच्या माध्यमातुन प्रयत्न सुरु आहेत. आम्ही त्याबाबत पाठपुरावा करू, मात्र आमच्या कामाचे श्रेय कोणीही घेऊ नये असेही प्रदीप कंद यांनी यावेळी स्पष्ट केले.