ओमकार भोरडे
पुणे: महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार आणि पुणे जिल्हाधिकारी तसेच शिरूर उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर तालुक्यात ‘जिवंत सातबारा’ मोहीम राबवली जात आहे. या मोहिमेद्वारे मयत खातेदारांच्या 7/12 उताऱ्यावर त्यांच्या वारसांची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
1 ते 5 एप्रिल 2025 दरम्यान चावडी वाचनाद्वारे, न्यायप्रविष्ट प्रकरणे वगळता, गावनिहाय मयत खातेदारांची यादी तयार झाली. 6 ते 20 एप्रिल 2025 या कालावधीत तलाठी स्थानिक चौकशी करून आवश्यक कागदपत्रांसह वारस निश्चित करणार आहेत. त्यानंतर 21 एप्रिल ते 10 मे 2025 दरम्यान ई-फेरफार प्रणालीद्वारे फेरफार तयार होऊन मंडळ अधिकारी अंतिम निर्णय घेतील. यामुळे सर्व जिवंत वारसांची नोंद सातबारा उताऱ्यावर होणार आहे.
शिरूर तालुक्यातील 10 मंडळांमध्ये 806 मयत खातेदार आढळले असून, त्यांचा तपशील, शिरूर-35, रांजणगाव-61, तळेगाव ढमढेरे-85, कोरेगाव भिमा-54, पाबळ-93, टाकळी हाजी-97, मलठण-118, वडगाव रासाई-54, न्हावरा-116, निमोणे-93.
दरम्यान, गावात न राहणाऱ्या खातेदारांसाठी ‘पब्लिक डेटा एंट्री (PDE)’ प्रणालीद्वारे मोबाईलवरून वारस नोंदणीची सुविधा उपलब्ध आहे. तहसिलदार बाळासाहेब म्हस्के यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, मयत खातेदारांची माहिती तलाठ्यांकडे देऊन या मोहिमेला सहकार्य करावे.
तहसिलदार या संदर्भात काय म्हणाले…
“जिवंत सातबारा’ ही केवळ प्रक्रिया नसून, गावातील मालमत्ता व्यवस्थापनात पारदर्शकता आणि वारस हक्कांच्या अचूक नोंदीसाठी एक क्रांतिकारी पाऊल आहे.”
– बाळासाहेब म्हस्के, तहसिलदार, शिरूर.