बारामती: देशात आगामी लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सर्वच पक्षांनी सुरु केली आहे. पुढील दहा ते पंधरा दिवसांत लोकसभा निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे. परंतु, या निवडणुकीपूर्वी देशासह संपूर्ण राज्याचे लक्ष पुणे जिल्ह्याकडे लागले आहे. कारण जिल्ह्यातील बारामती मतदार संघात नणंद विरुद्ध भावजय अशी लढत होण्याची दाट शक्यता आहे . गेल्या काही दिवसांपासून त्याची चर्चा सुरु होती. परंतु, आता स्वत: सुनेत्रा पवार यांनी निवडणूक लढवण्यासंदर्भात स्पष्ट संकेत दिले आहेत.
बारामतीमधील एका कार्यक्रमात बोलताना सुनेत्रा पवार म्हणाल्या की, बारामतीच्या विकासाचा तळागाळातील प्रत्येक जण साक्षीदार आहे. तुम्ही सर्वांनी अजित पवार यांना नेहमी प्रेम दिले आहे. त्या प्रेमाचे उतराई होण्याचा आम्ही प्रयत्न करु. अजितदादांप्रमाणे बारामतीकर माझ्यावर देखील प्रेम करतील. तुम्ही मला एक संधी द्याल, अशी आशा मी बाळगते. सुनेत्रा पवार यांचे हे वक्तव्य म्हणजे बारामती लोकसभेच्या त्या उमेदवार असल्याचे स्पष्ट संकेत आहे.
दरम्यान उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार गेल्या दोन दिवसांपासून बारामती दौऱ्यावर आहेत. दुसऱ्या दिवशी विविध विकासकामांचे उदघाटन आणि भूमिपूजन त्या करणार आहेत. शुक्रवारी सुनेत्रा पवार यांनी विश्वकर्मा जयंतीला देखील उपस्थिती लावली होती. यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवार बारामतीत सक्रिय झाल्याचे पाहण्यास मिळत आहे.