लोणी काळभोर, ता. 19 : लोणी स्टेशन परिसरात अवैध ताडी विक्रीचा पर्दापाश करण्यास लोणी काळभोर पोलिसांना यश आले आहे. या छाप्यात पोलिसांनी सुमारे 510 लिटर ताडी जप्त केली आहे. तर ताडी विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी ही कारवाई कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील हाडके पेट्रोल पंपाच्या समोर शनिवारी (ता.17) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास केली आहे.

शाहरुख युसुफ मन्सुरी (वय 29, रा. अंबिका माता मंदिरा शेजारी, घोरपडे वस्ती, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार शैलेश चांगदेव कुदळे यांनी सरकारच्यावतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील लोणी स्टेशन परिसरात असलेल्या वैष्णवी एन्टरप्रायजेस बिल्डींग मटेरियल सप्लायर्स या दुकानाचे बाजुला, एका पत्र्याच्या शेडच्या पाठीमागील बाजुस अवैध ताडी विक्री केली जात आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा शाहरुख मन्सुरी हा ताडी विक्री करताना मिळून आला.

लोणी काळभोर पोलिसांनी या छाप्यात १७ हजार ८५० रुपये किंमतीची ५१० लीटर प्लॅस्टीकचे कॅन मध्ये असलेली ताडी जप्त केली आहे. तर शाहरुख मन्सुरी याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस हवालदार राणी खामकर करीत आहेत.







