लोणावळा : गुन्ह्याचे कलम कमी करणे, जामिनासाठी मदत करणे आणि पुढील तपासात सहकार्य करून लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी लाच घेतल्याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. नाथा रामकिशन केकाण (वय ३८) असे या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. १६ नोव्हेंबर रोजी रात्री ७.१५ वाजता लोणावळ्यातील मॅप्रो गार्डनजवळील फूड कोर्ट येथे २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यांना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणातील ३३ वर्षीय तक्रारदाराच्या भावाविरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम १०९ (२), ३५२ आणि ३(५) नुसार गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक नाथा केकाण यांच्याकडे होता.
तक्रारदाराच्या म्हणण्यानुसार, भावाविरोधातील गुन्ह्याचे कलम कमी करण्यासाठी आणि जामीन मिळवून देण्यासाठी केकाण यांनी यापूर्वी वेळोवेळी एक लाख ३० हजार रुपये स्वीकारले होते. त्यानंतर १४ नोव्हेंबर रोजी भावावरील चॅप्टर केसच्या कारवाईत मदत करण्यासाठी, दाखल गुन्ह्याच्या पुढील तपासात सहकार्य करण्यासाठी तसेच लवकर आरोपपत्र दाखल करण्यासाठी आणखी ३० हजार रुपयांची मागणी केल्याचा आरोप आहे.

या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे यांनी १६ नोव्हेंबर रोजी लाच मागणीची पडताळणी केली. या पडताळणीदरम्यान केकाण यांनी यापूर्वी तक्रारदाराकडून लाचेची रक्कम स्वीकारल्याचे मान्य केल्याचे नमूद आहे. तसेच, पुढील कामांसाठी ३० हजार रुपयांऐवजी २० हजार रुपये स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचे पडताळणीत निष्पन्न झाले.
त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. १६ नोव्हेंबर रोजी लोणावळ्यात मॅप्रो गार्डनशेजारील फूड कोर्ट येथे पंचांसमक्ष तक्रारदाराकडून २० हजार रुपयांची लाच स्वीकारताना केकाण यांना सापळा पथकाने ताब्यात घेतले. रात्री ७.१५ वाजता ही कारवाई करण्यात आली.
या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ मधील कलम ७ अन्वये लोणावळा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिली.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस निरीक्षक मिथुन म्हात्रे यांनी केले. पोलीस उपअधीक्षक सतीश वाळके यांच्या पर्यवेक्षणाखाली सापळा पथकातील महिला पोलीस हवालदार वनिता गोरे, पोलीस शिपाई रवी दिवेकर आणि चालक पोलीस हवालदार दगडू सोनवणे यांनी कारवाईत सहभाग घेतला. पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे आणि अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.







