नवी दिल्ली : भारत आणि नेपाळमधील धार्मिक पर्यटनाला चालना देणारी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील प्रभू श्रीरामांचे जन्मस्थान अयोध्या धाम आणि नेपाळमधील माता सीतेचे जन्मस्थान जनकपूर धाम ही दोन धार्मिक स्थळे आता थेट रेल्वे मार्गाने जोडली जाणार आहेत. भारतीय रेल्वेने या नवीन साप्ताहिक रेल्वे सेवेला मंजुरी दिली असून, २१ नोव्हेंबरपासून ही सेवा सुरू होणार असल्याची माहिती आहे. या रेल्वेमुळे भारत आणि नेपाळमधील भाविकांना प्रवास करणे अधिक सोयीचे होणार असून, रामायण सर्किट पर्यटनालाही चालना मिळण्याची अपेक्षा आहे.

अयोध्या कॅन्ट ते जनकपूर धामदरम्यान धावणारी ही रेल्वे सुमारे ६०४ किलोमीटरचे अंतर पार करणार आहे. उत्तर प्रदेश आणि बिहारमधील अनेक महत्त्वाच्या शहरांमधून या रेल्वेचा मार्ग असेल.
या मार्गावर अयोध्या धाम, मानकापूर, बस्ती, गोरखपूर, नरकटियागंज, रक्सौल, सीतामढी, शिशो, मधुबनी आणि जयनगर या स्थानकांचा समावेश असल्याची माहिती आहे. या थेट रेल्वे जोडणीमुळे दोन्ही देशांतील धार्मिक आणि सांस्कृतिक संबंध अधिक दृढ होण्यास मदत होणार आहे.

नियोजित वेळापत्रकानुसार, ही साप्ताहिक रेल्वे दर शनिवारी नेपाळमधील जनकपूर धाम येथून सुटणार आहे. परतीच्या प्रवासासाठी दर सोमवारी सायंकाळी ५ वाजता अयोध्या कॅन्ट येथून रेल्वे रवाना होईल आणि मंगळवारी सकाळी ८ वाजता जनकपूरला पोहोचेल.
सुरुवातीला ही रेल्वे साप्ताहिक विशेष सेवा म्हणून चालवली जाणार आहे. प्रवाशांचा प्रतिसाद पाहून पुढे ती नियमित करण्याबाबत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. रेल्वेचे अंतिम वेळापत्रक आणि तिकीट बुकिंगसंबंधी तपशील लवकरच जाहीर केले जाणार आहेत.
अयोध्या आणि जनकपूर ही रामायणाशी संबंधित दोन महत्त्वाची धार्मिक स्थळे रेल्वेने जोडली जाणार असल्याने भाविकांसाठी ही मोठी सुविधा ठरणार आहे. त्यामुळे भारत-नेपाळ धार्मिक पर्यटनाला नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.






