पिंपरी-चिंचवड : आपल्या वाहनासाठी आकर्षक आणि पसंतीचा नोंदणी क्रमांक घेऊ इच्छिणाऱ्या वाहनधारकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड (मोशी) येथे दुचाकी वाहनांची नवीन नोंदणी मालिका लवकरच सुरू होणार आहे. या मालिकेतील आकर्षक क्रमांक विहित शुल्काच्या तीनपट शुल्क भरून आरक्षित करता येणार आहेत. यासाठी चारचाकी वाहनधारकांनी १८ नोव्हेंबर, तर दुचाकी वाहनधारकांनी १९ नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते दुपारी २.३० या वेळेत अर्ज सादर करावेत, असे आवाहन आरटीओकडून करण्यात आले आहे.

पसंतीचा नोंदणी क्रमांक आरक्षित करण्यासाठी वाहनधारकांनी विहित नमुन्यात अर्ज सादर करणे आवश्यक आहे. अर्जासोबत डिमांड ड्राफ्ट (डीडी), आधारकार्ड, पत्त्याचा पुरावा, फोटो ओळखपत्र आणि पॅनकार्ड यांच्या साक्षांकित प्रती जोडाव्या लागतील. डिमांड ड्राफ्ट ‘DY. R.T.O. PIMPRI CHINCHWAD’ यांच्या नावे राष्ट्रीयीकृत किंवा अनुसूचित बँकेचा असणे आवश्यक आहे.
चारचाकी वाहनांच्या आकर्षक नोंदणी क्रमांकांची यादी १९ नोव्हेंबर रोजी, तर दुचाकी वाहनांची यादी २० नोव्हेंबर रोजी आरटीओ कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध केली जाईल.

पसंतीच्या क्रमांकासाठी अतिरिक्त रकमेचा डीडी सीलबंद पाकिटात संबंधित दिवशी दुपारी २.३० वाजेपर्यंत जमा करावा लागेल. त्यानंतर दुपारी ३.३० वाजता लिलाव प्रक्रिया पार पडेल. सर्वाधिक रकमेचा डीडी सादर करणाऱ्या अर्जदाराला संबंधित पसंतीचा क्रमांक देण्यात येईल.
आरक्षित क्रमांकाबाबत मोबाईल संदेश प्राप्त झाल्यानंतर पाचव्या दिवशी वाहनधारकांनी आरटीओ कार्यालयातून पावती घ्यावी. तसेच, आरक्षित क्रमांकाचा वापर १८० दिवसांच्या आत वाहन नोंदणीसाठी करणे बंधनकारक आहे.
या मुदतीत वाहन नोंदणीसाठी सादर न केल्यास क्रमांकाचे आरक्षण रद्द करण्यात येईल. तसेच, भरलेले शुल्क परत मिळणार नाही, असे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.






