मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पुतळ्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते अनावरण झाल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. या अनावरणावरून विरोधकांनी अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यानंतर आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. “अमित शाह यांनी अजितदादांचं जगणं मुश्किल केलं होतं,” असा गंभीर आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन अमित शाह यांच्यावर जोरदार टीका केली. अजित पवार हयात असताना त्यांच्यावर आरोप करण्यात आले आणि आता त्यांच्याच पुतळ्याचे अनावरण करण्यात आले, यावरून ठाकरेंनी शाह यांना लक्ष्य केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, “अमित शाह किती दिवसांनी अवतीर्ण झाले? झेन-झीचे आंदोलन सुरू असताना ते कुठे होते? चकाट्या पिटणाऱ्या गृहमंत्र्यांनी हे बोलू नये. अजितदादा असताना त्यांच्यावर आरोप केले. त्याच अजितदादांच्या स्मारकाचे लोकार्पण काल त्यांनी केले. अजितदादा हयात असताना आरोप केले आणि काल त्यांनी नाक रगडलं.”

पुढे बोलताना त्यांनी कोरोना काळातील परिस्थिती, मणिपूर आणि अरुणाचल प्रदेशातील घटनांचा उल्लेख केला. देशातील महत्त्वाच्या प्रश्नांकडे लक्ष देण्याऐवजी गृहमंत्री राजकीय वक्तव्ये करत असल्याची टीका त्यांनी केली. “अमित शाह यांनी मध्यरात्री किंवा केव्हाही जाऊन अजितदादांच्या पुतळ्याला नाक घासून माफी मागायला हवी,” असेही ठाकरे म्हणाले.
दरम्यान, खासदार संजय राऊत यांनीही अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणावरून अमित शाह यांच्यावर टीका केली. “अमित शाह यांच्या हस्ते अजित पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण होणे ही त्यांच्या संपूर्ण जीवनप्रवासाची विडंबना आहे,” असा घणाघात राऊत यांनी केला.
राऊत यांनी अजित पवार हे देवेंद्र फडणवीस, अमित शाह आणि नरेंद्र मोदी यांच्या दबावाखाली तसेच मानसिक धक्क्यात होते, असा आरोप केला. अजित पवार यांना बदनाम करण्यासाठी नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांनी मोहीम चालवल्याचा दावाही त्यांनी केला.
संजय राऊत यांच्या आरोपानुसार, ‘भ्रष्टाचारी अजित पवार’ आणि ‘७० हजार कोटींचा सिंचन घोटाळा’ अशा आरोपांचा सातत्याने प्रचार करण्यात आला. अजित पवार यांना वारंवार घाबरवून आणि दबाव टाकून शरद पवार यांचा पक्ष सोडण्यास भाग पाडण्यात आले, असा दावाही राऊत यांनी केला.
अजित पवार यांच्या पुतळ्याच्या अनावरणानंतर उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी केलेल्या या टीकेमुळे राज्यातील राजकीय वादाला नवे वळण मिळाले आहे. मात्र, या आरोपांवर अमित शाह किंवा भाजपकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागले आहे.






