अक्कलकोट : सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट येथे ‘सेफ फूड, सेफ महाराष्ट्र’ मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासनाने (FDA) पेढा उत्पादक आणि मिठाई विक्रेत्यांविरोधात मोठी कारवाई केली आहे. श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील दुकानांसह मुख्य मिठाई पुरवठादाराच्या तपासणीत एकूण ८५० किलो मिठाईचा साठा जप्त करण्यात आला. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखालील FDA प्रशासनाच्या या कारवाईमुळे मिठाई विक्रेत्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

अक्कलकोटमधील पिरजादे प्लॉट येथील रंगोली स्वीट मार्टमध्ये तपासणीदरम्यान अस्वच्छ स्थितीत मिठाईची साठवणूक केल्याचे आणि लेबलिंगविषयक नियमांचे उल्लंघन झाल्याचे प्रशासनाने सांगितले. मिठाईच्या दर्जाबाबत संशय निर्माण झाल्याने पथकाने ३९८ किलो कंदी पेढा आणि ४३१ किलो स्वीट हलवा असा एकूण ८२९ किलो साठा जप्त केला. या साठ्याची किंमत २ लाख ५० हजार २० रुपये आहे.
जप्त केलेल्या दोन्ही पदार्थांचे नमुने प्रयोगशाळेतील विश्लेषणासाठी घेण्यात आले आहेत. तसेच, संबंधित पुरवठादाराचा अन्न व्यवसाय परवाना निलंबित करण्यात आला आहे.

१३ नोव्हेंबर रोजी FDA पथकाने श्री स्वामी समर्थ मंदिर परिसरातील पेढा आणि प्रसाद विक्री करणाऱ्या १२ दुकानांची तपासणी केली. यावेळी सलिम मकानदार पेढा स्टॉलमधून ३ किलो, तर रंगोली स्वीट मार्टच्या मंदिराजवळील दुकानातून १८ किलो स्वीट हलवा जप्त करण्यात आला. या एकूण २१ किलो मिठाईची किंमत ७ हजार ३५० रुपये आहे. या तपासणीदरम्यान चार नमुनेही विश्लेषणासाठी घेण्यात आले.
तपासणीत आढळलेल्या त्रुटींमुळे समर्थ स्वीट स्टॉल, पाटील स्वीट शॉप, रंगोली स्वीट मार्टचे मंदिराजवळील दुकान आणि सलिम मकानदार पेढा स्टॉल यांना व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. याशिवाय, मंदिरासमोरील गुरुकृपा पूजा भंडारची अन्न व्यवसाय नोंदणीही निलंबित करण्यात आली आहे.
ही कारवाई सहआयुक्त (अन्न) श्रीकांत आर. करकळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या पथकात सहायक आयुक्त (अन्न) एस. ई. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी उ. म. एखंडे, एन. एस. हिरेमठ आणि आर. आर. पाटील यांचा समावेश होता.
कार्तिकी वारी आणि स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोट येथे येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि दर्जेदार अन्नपदार्थ मिळावेत, या उद्देशाने ही तपासणी करण्यात आली. जप्त केलेल्या मिठाईचे नमुने प्रयोगशाळेत तपासल्यानंतर त्यांचा दर्जा स्पष्ट होणार आहे.






