पंढरपूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे १७ ते २३ नोव्हेंबर २०२६ दरम्यान होणाऱ्या कार्तिकी वारी सोहळ्यासाठी मध्य रेल्वेने विठ्ठल भक्तांना मोठा दिलासा दिला आहे. वारीसाठी होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने मिरज-लातूर आणि मिरज-सोलापूर मार्गांवर एकूण ३६ विशेष अनारक्षित गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांना प्रवासासाठी अधिक पर्याय उपलब्ध होणार आहेत.

मिरज ते लातूरदरम्यान दोन टप्प्यांत एकूण २२ विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात १४, तर दुसऱ्या टप्प्यात ८ विशेष सेवा असतील. या गाड्यांना सांगोला, पंढरपूर, कुर्डुवाडी आणि धाराशिव या महत्त्वाच्या स्थानकांवर थांबे देण्यात येणार आहेत.
सोलापूर ते मिरजदरम्यान १७ ते २३ नोव्हेंबर या कालावधीत १४ विशेष गाड्या धावणार आहेत. या गाड्यांना मोहोळ, माढा, कुर्डुवाडी आणि पंढरपूर येथे थांबे देण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर आणि परिसरातील भाविकांनाही वारीसाठी पंढरपूरला पोहोचणे सोयीचे होणार आहे.

या सर्व विशेष गाड्यांना सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्यात आले आहेत. प्रवाशांना या गाड्यांची तिकिटे यूटीएस (UTS) प्रणालीद्वारे बुक करता येणार आहेत. या प्रवासासाठी मेल आणि एक्स्प्रेस गाड्यांचे नियमित भाडे लागू राहणार आहे.
कार्तिकी वारीच्या काळात पंढरपूरमध्ये भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. भाविकांनी प्रवासाला निघण्यापूर्वी गाड्यांचे वेळापत्रक तपासूनच प्रवासाचे नियोजन करावे, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.






