सासवड: सासवड पोलिसांनी हिरवे रस्त्यावरील बिंगो-चक्री जुगाराच्या अड्ड्यावर 28 मार्चला छापा टाकला. छापा टाकल्यानंतर आरोपींना पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर खूप मोठी आर्थिक डील झाली. त्याठिकाणी टीव्ही दुरुस्ती होत असल्याची दैनंदिनीमध्ये नोंद करून आरोपींना चक्क क्लीनचीट दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे पुणे जिल्हा (ग्रामीण) पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे.
सासवड पोलीस ठाण्यात कर्तव्यावर असलेल्या एका पोलीस हवालदाराला सासवड-हिवरे रस्त्यालगत असलेल्या एका ठिकाणी राजू नामक व्यक्ती लोकांकड़ून पैसे घेऊन बिंगो-चक्री जुगार खेळवत आहे, अशी माहिती मिळाली होती. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्वरित छापा टाकला. तेव्हा त्या ठिकाणी जुगार सुरु होता. या कारवाईत पोलिसांनी रोख रक्कम, जुगाराचे साहित्य व बिंगो चक्रीचा जुगार खेळण्यासाठी लागणारी एलईडी टीव्ही जप्त केला होता. तसेच आरोपींवर कारवाई करण्यासाठी त्यांना पोलीस ठाण्यात आणले होते.
त्यानंतर मात्र, पोलीस हवालदार बहाद्दराने कारवाई न करता मोठी आर्थिक मांडवली करून लाखो रुपये उकळले. अवघ्या अर्ध्या तासाच्या आत आरोपींना मोकाट सोडून देऊन त्यावर ‘विजय’श्री मिळविला. त्यानंतर आपण गोळा केलेली आर्थिक माया कोणाच्या लक्षात येऊ नये म्हणून पोलीस ठाण्यातील नोंदवहीत त्याठिकाणी अवैध जुगार व्यवसाय सुरु नव्हता. तर त्या ठिकाणी एक व्यक्ती टीव्ही रिपेरिंगचे काम करीत होता, अशी पोलीस ठाण्यात नोंद करून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची दिशाभूल केली.
सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरु आहे. पोलीस ठाण्याच्या हद्दीत 10 ते 12 बिंगो-चक्री जुगाराचे अड्डे, ३ मटक्याचे अड्डे, जुगाराचे ३ क्लब, दोन हुक्का पार्लर, गांजा २ ठिकाणी, तर 40 ते 50 ठिकाणच्या हॉटेल व फार्म हाऊसवर बेकायदा हातभट्टी दारू विक्री राजरोसपणे सुरु आहे. अवैध धंदे बंद करावेत म्हणून नागरिकांनी अनेक आंदोलने केली आहेत. मात्र, अवैध धंदे काही बंद झाले नाहीत. कारण हे अवैध धंदे पोलीस ठाण्यातील आका आणि बोका या दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने बिनदिक्कतपणे सुरु आहेत. तर या अवैध धंद्यातून 12 ते 15 लाख रुपयांची माया गोळी होत असल्याची जोरदार चर्चा नागरिकांमध्ये रंगली आहे.
बिंगो-चक्री जुगाराच्या गुन्ह्यात ‘विजयश्री’ मिळविलेल्या पोलीस हवालदाराला तीन वेळा पोलीस दलातून निलंबित केले आहे. तसेच त्याला शिक्षा म्हणून पोलीस हवालदार पद काढून घेत पोलीस शिपाई पदावरही आणलेले होते. तरीही त्याने अवैध धंदे चालकांना पाठीशी घालून गोरख धंदे सुरु ठेवले आहेत. अवैध धंदे सुरळीत हाकण्यासाठी पोलीस दलातील एका ‘विकासा’चीही साथ मिळाली आहे. तसेच या दोघांनी अवैध धंदेवाल्यांकडून माया गोळा करण्यासाठी एका ”दादा”ची निवडसुद्धा केलेली आहे. या तिघांनी मिळून सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत ‘धुमा’कू’ळ घातल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
दरम्यान, 28 मार्चला बिंगो-चक्री जुगाराच्या अड्ड्यावर पोलिसांनी छापे टाकलेले व्हिडीओ पुणे प्राईम न्यूजच्या हाती लागले आहेत. त्यामुळे पोलीस दलातील कर्मचाऱ्यांनी टीव्ही रिपेरिंग सुरु आहे, अशी दिलेली माहिती एकदम खोटी असल्याचे स्पष्ट झाले आहे. म्हणून जिल्हा (ग्रामीण) पोलीस अधीक्षकांच्या आदेशाला सासवड पोलिसांकडून ” वाटाण्याच्या अक्षता” दाखवून सर्वच प्रकारचे अवैध धंदे नव्या जोमाने सुरु केल्याचे दिसून येत आहे. यामुळे सासवड पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. तर स्वच्छ प्रतिमा म्हणून ओळख असलेले पंकज देशमुख हे या दोन कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.