-दीपक खिलारे
इंदापूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या लाडकी बहिण या महत्वाकांक्षी योजनेचा इंदापूर तालुक्यातील 1 लाख 5 हजार महिलांना थेट लाभ मिळाल्याने महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले असल्याचे प्रतिपादन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर यांनी केले.
इंदापूर शहरातील संत सावता माळी मंदिर सावता माळीनगर येथे रविवारी (दि. 10) राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार) या पक्षात कर्मयोगी शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक अतुल नानासाहेब व्यवहारे यांनी शेकडो समर्थकांसह जाहीर पक्षप्रवेश केला. इंदापूर विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे, पक्षाचे प्रवक्ते डॉक्टर शशिकांत तरंगे यांच्या उपस्थितीत केला. त्यावेळी चाकणकर बोलत होत्या.
यावेळी बोलताना चाकणकर पुढे म्हणाल्या की, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती नंतर इंदापूरला सहा हजार कोटी रुपयांचा सर्वाधिक निधी दिला आहे. संत शिरोमणी सावता महाराज यांनी समाजात भक्ती मांडली, तसे आमदार दत्तात्रय भरणे जे समाजासाठी काम करतात. त्याच कामात माझा देव आहे. भक्ती आहे असे मानून त्यांनी तालुक्यातील प्रत्येक गाव, वाड्या- वस्त्या रस्त्याने जोडल्या गेल्या आहेत.
लाडकी बहिण योजनेला कोणीही मध्यस्थी नाही, बऱ्याच महिलांचे जोडखाते होते. मात्र स्वतंत्र खाते या योजनेमुळे झाले. महिलांना आर्थिक स्वावलंबन मिळाले आहे. विरोधकांना जनतेसमोर जाताना काही कामे नाहीत, योजना नाहीत. त्यामुळे टीका करतात याकडे लक्ष देऊ नका, असेही रुपाली चाकणकर यांनी सांगितले.
दत्तात्रय भरणे म्हणाले, शासनाने लाडक्या बहिणींसाठी, शेतकऱ्यांच्या हितासाठी, सुशिक्षित बेरोजगारांच्या हाताला काम मिळण्यासाठी, अभिनव योजना आणल्या. यामुळेच महिलांची तरुणांची युवकांची प्रगती झाली. गॅस सिलेंडर वर्षाला तीन फ्री देऊन गरीब कुटुंबाचे कल्याण सरकारने साधले आहे. युवक नेते अतुल व्यवहारे यांनी योग्यवेळी निर्णय, घेतल्यामुळे, तालुक्याच्या हिताच्या गोष्टी होणार आहेत. त्यामुळे आगामी काळात राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून अतुल व्यवहारे यांना ताकद दिली जाईल. अशी ही ग्वाही उमेदवार आमदार दत्तात्रय भरणे यांनी दिली.
ते पुढे म्हणाले, आपण शिरसोडीचा पूल काही दिवसांपूर्वी मंजूर केला. हा पूल झाल्यानंतर, इंदापूर शहरातील मार्केटला किती चांगले दिवस येणार आहेत. किती मोठा विकासात्मक बदल होईल. या गोष्टीचे विरोधकांनी कौतुक करायला पाहिजे होते, मात्र या होणाऱ्या पुलावर टीका केली हे बरोबर नसल्याचे भरणे यांनी सांगितले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक अप्पासाहेब जगदाळे, इंदापूर अर्बन बँकेचे चेअरमन देवराज जाधव, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चे तालुकाध्यक्ष हणुमंत कोकाटे, दीपक जाधव, अतुल व्यवहारे, अक्षय शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
या पक्ष प्रवेशास बाळासाहेब पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन तुषार जाधव, संदीप पाटील, तुकाराम करे, शिवाजी तरंगे, रमेश शिंदे, अनिल राऊत, अरविंद वाघ, उमाताई इंगोले आदी उपस्थित होते.