मुंबई : शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी अजित पवारांचे काही खासदार, आमदार पुन्हा शरद पवारांकडे येणार असल्याचा दावा केला होता. तेव्हापासूनच राजकीय वर्तुळात चर्चांनी जोर धरला होता. अशातच आता अजित पवारांच्या एका आमदारानं रोहित पवारांचा दावा म्हणजे फुसका बॉम्ब सांगून एक खळबळजनक विधान केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे यांनी रोहित पवारांवर निशाणा साधत रोहित पवार यांचा गौप्यस्फोट नसून तो एक फुसका बॉम्ब, असल्याचं म्हटलं आहे. तसेच, शरद पवार आणि इंडिया आघाडीचे काही आमदार, खासदारच अजित पवारांकडे येणार असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार राजू कारेमोरे बोलताना म्हणाले की, ‘आमदार रोहित पवार यांनी केलेला गौप्यस्फोट नसून तो फुसका बॉम्ब आहे.’ अशी खिल्ली भंडाऱ्याच्या तुमसरचे राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी उडविली आहे. उलट शरद पवार यांच्या पक्षासह इंडिया आघाडीचे काही आमदार आणि खासदार हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत येणारं असल्याचा दावाही आमदार राजू कारेमोरे यांनी केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे काही आमदार शरद पवारांच्या पक्षात येणार असल्याचा गौप्यस्फोट आमदार रोहित पवार यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्याला उत्तर देताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजू कारेमोरे यांनी त्यांचा दावा खोडून काढला. मुंबईत पार पडलेल्या पक्षाच्या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचं चिंतन आणि मनन झालं. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विकासासोबत आम्ही त्यांच्यासोबत असून अजित पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही अजित पवार यांच्या पाठीशी एकनिष्ठतेने उभे आहोत. आमच्यातला एकही आमदार फुटणारा नाही, उलट इतर पक्षांसह इंडिया आघाडीतून काही आमदार आणि खासदार राष्ट्रवादी पक्षात (अजित पवार) येताना दिसतील, असा दावा आमदार कारेमोरे यांनी केला आहे.
काय म्हणाले होते रोहित पवार?
लोकसभा निवडणुकीत अजित पवारांचा भोपळा फुटला मात्र केवळ एकाच जागेवर समाधान मानावं लागलं. अशातच लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर अजित पवारांनी मुंबईत आढावा बैठक घेतली. या बैठकीला अनेक आमदारांनी दांडी मारल्याचं पाहायला मिळालं. त्यावेळी अजित दादांचे काही आमदार शरद पवारांकडे येण्याच्या तयारीत असल्याचा दावा रोहित पवारांनी केला होता.
रोहित पवार म्हणालेले की, पुढील 15 दिवसांत अजित पवार गटातील आमदारांना निर्णय घ्यावा लागणार आहे. कारण, शरद पवार यांनी विधानसभेची तयारी सुरू केली आहे. विधानसभेसाठी 30 उमेदवारांची नावं शरद पवारांनी फिक्स केली आहेत. अजित पवार गटात असलेल्या मंत्र्यांविरोधात उमेदवार फायनल झाले आहेत. 18 ते 19 आमदार संपर्कात आहेत. त्यातील किती आमदारांना पक्षात घ्यायचं, हे मात्र शरद पवार आणि जयंत पाटील ठरवणार आहेत.