बापू मुळीक
पुणे : पुरंदर उपसा योजनेचे चार पंप असून, पंप हाऊसला सध्या तरी एकच पंप चालू आहे. तो देखील सुरळीत चालत नाही. अशामुळे वितरिकेवरील शेवटच्या गावांना पाणी पोहोचणे कठीण जात आहे. तेव्हा आठ ते दहा दिवसात दुसरा पंप चालू करण्याचे निर्देश हे पुरंदर हवेलीचे आमदार विजय शिवतारे यांनी दिले. पहिलीच बैठक पुरंदर उपसा योजना सुरळीत करण्यासाठी पुण्यातील सिंचन भवन येथे घेण्यात आली. या बैठकीला जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता हनुमंत गुणाले, अधीक्षक अभियंता पृथ्वीराज फाळके, कार्यकारी अभियंता अशोक शेटे, यांत्रिकी विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश भोसले, कार्यकारी अभियंता नितीन जैयस्वाल, उप अभियंता दत्तात्रय कसबे, या पुरंदर उपसा क्षेत्रातील शेतकरी व प्रतिनिधी आदी उपस्थित होते.
यावेळी शिवतारे म्हणाले की, दोन महिन्यात तिसरा पंप देखील चालू करण्यासाठी सूचना केली आहे. पाण्याचे योग्य नियोजन होण्यासाठी ऑनलाईन पैसे भरावेत. जनाई योजनेवरील नायगाव, पांडेश्वर, राजुरी, आणि रिसेपिसे या गावांना जनाई योजनेतून पुरेसे पाणी मिळत नसल्याने त्यांना पुरंदर उपसाचे पाणी मिळावे, यासाठी सीएसआर किंवा शासकीय निधीतून येथे जलवाहिनी करण्यासाठी प्रस्ताव करावा, अशा सुद्धा सूचना शिवतारे यांनी केल्या आहेत.
मंजूर झालेले 55 कोटीची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत, अशी सुद्धा शेतकरी व प्रतिनिधींनी मागणी केली आहे. यावेळी बैठकीला रमेश इंगळे, समीर जाधव, राजाराम झेंडे, गणेश मुळीक, एडवोकेट नितीन कुंजीर, संतोष यादव, शरद यादव, किशोर खळदकर, मयूर मुळीक, सागर यादव, निखिल यादव, राजेंद्र गद्रे ,सागर करवंदे, मनोज कुंजीर आदी उपस्थित होते.