पुणे : पुणे शहरात चौघांना सायबर चोरट्यांनी १ कोटी २६ लाख रुपयांचा आर्थिक गंडा घातला आहे. पोलिस, सीबीआय, कस्टम अधिकारी असल्याची बतावणी करत तर कधी टास्क फ्रॉडच्या नावाने सायबर चोरटे नागरिकांचे करोडो रुपये लंपास करत आहेत. त्यामुळे पुणेकर सायबर चोरट्यांच्या जाळ्यात अडकले आहेत.
टास्क फ्रॉडच्या आमिषाने ४२ वर्षीय व्यक्तीची फसवणूक
पहिल्या घटनेत टास्क फ्रॉडचे आमिष दाखवून कोथरूड येथील ४२ वर्षीय व्यक्तीला वेगवेगळ्या बँक खात्यांवर पैसे टाकण्यास सांगितले. सुरुवातीला किरकोळ रकमेचा परतावा देत त्यांचा विश्वास संपादन केला. त्यानंतर त्यांना ४ लाख ३२ हजार २५० रुपये व्हॉट्सअपद्वारे ऑनलाइन ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांना ५ हजार रुपये मोबदला दिल्यानंतर कोणतीही रक्कम सायबर चोरांनी परत केली नाही. हा प्रकार २० ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान घडला. याप्रकरणी शुक्रवारी (दि. ६) गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्हा दाखल झाल्याचे सांगत फसवणूक
दुसऱ्या घटनेत वाघोली येथील तरुणाला तुमच्या नावे गुन्हा दाखल झाल्याचे सांगत, अटक टाळण्यासाठी पैशांची मागणी केली. त्याच्याकडून वेळोवेळी ४१ लाख ४० हजार रुपये घेतले. हा प्रकार २९ ऑक्टोबर ते १५ नोव्हेंबर या कालावधीत घडला. याप्रकरणी वाघोली पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावे गुंतवणूक करण्यास सांगून फसवणूक
तिसऱ्या घटनेत सायबर चोरांनी फॉरेक्स ट्रेडिंगच्या नावे गुंतवणूक करण्यास सांगून वाघोली येथील ३७ वर्षीय व्यक्तीला ३३ लाख ७८ हजार ३२० रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार ५ मे ते १६ जुलै या कालावधीत घडला. याप्रकरणी पोलिसांनी शुक्रवारी (दि. ६) मेलआयडी धारक, वेब लिंक धारक आणि विविध बँक धारकांवर गुन्हा दाखल केला.
जादा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने फसवणूक
चौथ्या घटनेत स्टॉक व शेअर ट्रेडिंगमार्फत नफा मिळवून देतो असे सांगत सायबर चोरांनी फुरसुंगी येथील ४४ वर्षीय व्यक्तीला ४९ लाख ५५ हजार ५०० रुपयांचा गंडा घातला. हा प्रकार २१ डिसेंबर २०२३ ते ५ फेब्रुवारी २०२४ या कालावधीत घडला आहे. दरम्यान, मागील काही दिवसापासून सायबर चोरट्यांनी नागरिकांना विविध बहाण्याने आर्थिक गंडा घालण्यास सुरुवात केली आहे. याबाबत पोलिसांनी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.