पुणे : इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथे 23 वर्षीय गर्भवती महिलेचा घरीच गर्भपात केल्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलिसात मृत महिलेचा पति, सासू-सासरे अशा तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ऋतुजा राहुल धोत्रे (वय -23) असं मृत्यू झालेल्या महिलेचं नाव आहे. तर राहूल भिमराव धोत्रे (पती), लक्ष्मी भिमराव धोत्रे (सासू) आणि भिमराव उत्तम धोत्रे (सासरे) (सर्व रा. वडापुरी ता. इंदापुर जि. पुणे) अशी आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ऋतुजा आणि राहुल धोत्रे यांचा सात वर्षापूर्वी विवाह झाला होता. त्यांना एक मुलगा एक मुलगी अशी अपत्य आहेत. ती चार महिन्यांची गर्भवती असताना कुटुंबियांनी तिची गर्भ तपासणी केली. तिच्या पोटात स्त्री जातीचा गर्भ आहे हे माहिती झाल्यानंतर पती, सासू आणि सासरे या सर्वांनी मिळून खासगी डॉक्टर घरी बोलावून ऋतूजाला गर्भपात होण्याच्या गोळ्या, औषधी देऊन तिचा रविवारी गर्भपात केला. चार महिन्यांचे स्त्री जातीचे अर्भक जमिनीत पुरून टाकले. यामध्ये ऋतुजाचा अतिरक्तस्त्राव झाल्याने काल सोमवारी (दि.23) रोजी मृत्यू झाल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
याप्रकरणी इंदापूर पोलिसात मृत महिलेचा पति, सासू-सासरे अशा तिघांवर भारतीय न्याय दंड संहिता 2023 चे कलम 90, 91, 85, 3(5) नुसार मृत महिलेचा भाऊ विशाल शंकर पवार याच्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अधिक तपास पोलिस निरीक्षक सुर्यकांत कोकणे यांच्या मार्गदर्शनाखाली सह.पो.निरीक्षक गटकुळ करीत आहेत.
नातेवाईकांनी केलेल्या आरोपा नुरूप संबंधित महिलेचा घरगुती गर्भपात केल्याने मृत्यू झाला असल्याचे म्हणणे आहे. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संशयित एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. दरम्यान डॉक्टरांच्या पथकाकडून शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर पुढील ठोस कार्यवाही करण्यात येईल.
– डॉ.सुदर्शन राठोड, उपविभागीय पोलिस अधिकारी