पुणे: पुण्यातील गावांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. प्रत्येक गावामध्ये काही कारणांवरून वाद होतात. या वादाची वेळीच दखल घेतली नाही तर याचे रूपांतर हिंसेत होते आणि कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून पुणे जिल्ह्यात ‘‘ एक गाव, एक पोलीस पाटील, एक पोलीस अंमलदार ’’ ही नवीन योजना सुरू करण्यात आली आहे. ही योजना ‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ या मोबाईल अॅपद्वारे राबविण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी या नावीन्यपूर्ण तंत्रज्ञानावर आधारित योजनेबाबत माहिती दिली.
पुणे जिल्ह्यामध्ये 13 तालुके, 33 पोलीस ठाणे व 1574 गावे आहेत. या योजनेकरीता 1292 पोलीस पाटील व 1525 पोलीस अंमलदार हे प्रत्येक गावाकरीता नेमण्यात आलेले आहेत. ही योजना ‘सुरक्षित पुणे ग्रामीण’ या मोबाईल अॅपद्वारे अंमलात येणार आहे. या अॅपच्या माध्यमातून पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांची नोंदणी करण्यात आली आहे. हा उपक्रम 1 मे 2025 पासून सुरु करण्यात आला आहे.
यामध्ये पोलीस पाटील व पोलीस अंमलदार यांनी गावास भेट देताना, त्यांचे जिओ टॅग लोेकेशन व फोटो अपलोड करणे अपेक्षित आहे. यामुळे प्रभावीपणे ही योजना अंमलात आणण्यास मदत होईल. गाव पातळीवर कायदा व सुव्यवस्था राखली जावी, पोलिसांशी विश्वासपूर्ण वातावरण निर्माण व्हावे. तसेच सामुदायिक पोलिसिंगला चालना मिळावी, महिला व बालकांच्या संबंधित गुन्ह्यांमध्ये विलंब न होता त्यांना तत्काळ न्याय मिळवून देणे हा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सांगितले.