पुणे : जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानमधील दहशतवादी स्थळ नष्ट करून ऑपरेशन सिंदुरद्वारे प्रत्युत्तर दिल. यानंतर गेल्या तीन ते चार दिवसापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यात तणाव वाढला होता.अखेर या युद्धाला पूर्णविराम मिळाला आहे. मात्र रेल्वे आणि हवाई वाहतूक या युद्धजन्य परिस्थितीमुळे प्रभावित झाली असून नागरिकांमध्ये भीतीच वातावरण कायम आहे.पुण्यातून देशाच्या सीमावर्ती भागात जाणाऱ्या रेल्वे तिकिटांच्या रद्द होण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार,पुण्यातून देशाच्या सीमावर्ती भागात जाणाऱ्या रेल्वे तिकिटांच्या रद्द होण्याच्या प्रमाणात झपाट्याने वाढ झाली आहे. पुण्याहून जम्मू, काश्मीर, राजस्थान, जयपूर, जोधपूरसारख्या सीमावर्ती भागांमध्ये जाणाऱ्या रेल्वेची तिकिटं प्रवाशांनी मोठ्या प्रमाणावर रद्द केली आहेत. सध्या निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे रेल्वे प्रवासी वाहतुकीवर थेट परिणाम दिसून येत आहे.
गेल्या काही दिवसांत या मार्गांवरील गाड्यांना जबरदस्त मागणी होती. सुट्ट्यांचा माहोल, उकाडा यामुळं उत्तरेकडे जाणाऱ्यांचा ओघ वाढता होता. रेल्वेची प्रतीक्षा यादी 300-350 पर्यंत गेली होती. मात्र, हवाई हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वेच्याही तिकीट रद्दीकरणात लक्षणीय वाढ झाली.
कोणत्या रेल्वेगाड्यांमध्ये झाले बदल?
पुणे-जम्मू तावी एक्सप्रेस (11077):
सेकंड एसी: 98 वरून 14
थर्ड एसी: 287 वरून 57
स्लीपर: 376 वरून 99
पुणे-जयपूर एक्सप्रेस (12939):
फर्स्ट एसी: 12 वरून 9
सेकंड एसी: 56 वरून 20
थर्ड एसी: 143 वरून 59
स्लीपर: 164 वरून 64
पुणे (हडपसर)-जोधपूर एक्सप्रेस (20496):
सेकंड एसी: 19 वरून 8
थर्ड एसी: 43 वरून 20
स्लीपर: 186 वरून 45
उन्हाळी पर्यटनासाठी प्रवाशांची प्रचंड झुंबड उडत होती, पण आता यद्धजन्य परिस्थितीनंतर प्रतीक्षा यादी 150 ते 200 ने घसरली असल्याची माहिती रेल्वे सूत्रांनी दिली आहे.