दौंड, (पुणे) : जुन्या भांडणाच्या रागातून दौंड येथील एका व्यापाऱ्याला आणि त्याच्या मित्राला ५ ते ६ जणांनी लोखंडी पाईप, चाकु व फायटरने बेदम मारहाण केल्याची घटना घडली आहे. शहरातील गांधी चौक येथे सोमवारी (ता. ०८) रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. याप्रकरणी पाच जणांवर दौंड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कपिल किशोर धनवाणी (वय-37, व्यवसाय व्यापारी रा. श्रीकृष्ण कॉंप्लेक्स, गांधी चौक ता. दौंड) असे मारहाण झालेल्या व्यापाऱ्याचे नाव आहे. तर माऊली क्षिरसागर, दादा माऊली क्षिरसागर (दोघे रा. सुतारनेट ता. दौंड) तसेच आणखी 2 ते 3 जण अशी मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी धनवाणी यांनी दिलेल्या तक्रारीनुसार त्यांच्यावर मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कपिल धनवाणी यांचे श्रीकृष्ण कॉंप्लेक्स, गांधी चौक, दौंड येथे दुकान आहे. नेहमीप्रमाणे रात्री साडेदहा वाजता दुकान बंद करून घरी जात होते. यावेळी शेजारील दुकानदार क्षीरसागर याने मागील भांडणाचा राग मनात धरुन दुकानासमोर उभा असताना डोक्यात हाताने मारहाण केली.
यावेळी त्याचा मुलगा दादा क्षिरसागर आणि त्यांचे अनोळखी 2 ते 3 मित्र बोलावुन घरी जात असताना पाठीमागुन येवुन लोखंडी पाईप, चाकु व हातातील फायटरने मारहाण केली. यावेळी मित्र सुरज खुडे हा धनवाणी यांची भांडणे सोडविण्यासाठी आला असता त्याला ही लोखंडी पाईपने तसेच हाताने लाथाबुक्यांनी मारहाण केली. या घटनेत धनवाणी यांना गंभीर दुखापत झाली आहे.
याप्रकरणी धनवाणी यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरून माऊली क्षिरसागर, दादा क्षिरसागर, व त्याचे अनोळखी 2 ते 3 मित्र यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार पांढरे करीत आहेत.