इंदापूर : राज्यात आगामी विधानसभा निवडणुकांचे वारे वाहत असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अशातच माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ सोडल्यामुळे इंदापूरमध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे. हर्षवर्धन पाटील आज ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यासोबत त्यांचा मुलगा राजवर्धन पाटील आणि मुलगी अंकिता पाटील ही देखील शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत. इंदापूर येथील मार्केट कमिटी येथील मैदानावर घेण्यात येणाऱ्या सभेमध्ये शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये ते तुतारी फुंकणार आहेत. या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
तसेच या सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते देखील उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळत आहे. लोकसभा निवडणुकीच्या वेळेस देवेंद्र फडणवीस इंदापूरमध्ये प्रचारासाठी आले होते. त्यावेळी त्यांनी हर्षवर्धन पाटील यांना शब्द दिला होता की विधानसभेला मी तुम्हाला उमेदवारी देतो. परंतु हर्षवर्धन पाटील यांना भाजपतून विधानसभेचे तिकीट मिळणार नाही हे जवळपास निश्चित झाल्याने हर्षवर्धन पाटील हे आज शरदचंद्र पवार गटात प्रवेश करणार आहेत.
भाजपची साथ सोडण्यामागचं कारण काय?
हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ का सोडली आणि ते शरद पवार गटामध्ये का प्रवेश करणार आहेत यामागचं कारण त्यांनी सांगितले आहे. त्यांनी सांगितले की, ‘मी आज प्रवेश करतोय. १० वर्षे तालुक्याचा विकास का झाला नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी देईल. प्रत्येकाला निवडणुकीत इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार आहे. मोठी तयारी आमची झालेली आहे. ही निवडणूक जनतेने हातात घेतले आहे.’ तर, राष्ट्रवादी कॉग्रेस पार्टीत आजचा प्रवेश विधानसभा प्रचाराची सुरूवात आहे असं राजवर्धन पाटील यांनी सांगितले. इंदापूरमध्ये लोकं दहशतीखाली आहेत.
स्थानिक आमदारांनी इंदापूरचा बिहार केला..
स्थानिक आमदारांनी इंदापूरचा बिहार केला आहे. इथे दिवसाढवळ्या गोळीबार होतो, अशी टीका राजवर्धन पाटील यांनी आमदार दत्तात्रय भरणे यांच्यावर केली. अंकिता पाटीलने सांगितले की, ‘इंदापूरच्या जनतेच्या आग्रहाखातर आम्ही आज राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करत आहोत. मी जिल्हा परिषद सदस्य आहे. कुठेही इंदापूर तालुक्यात विकास कामं झाली नाहीत. सर्व जबाबदारी आमदाराची आहे. दिवसाढवळ्या गोळीबार होतोय. मलिदा गँगने इंदापूर तालुक्याची वाट लावली. संपूर्ण भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी अशी मागणी आम्ही करणार आहोत. आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर चर्चा केली. सर्व परिस्थिती आम्ही त्यांना सांगितली. त्यांना या गोष्टीची कल्पना आहे.’ असे अंकिता पाटील यांनी सांगितले.