Prabha Atre : ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे पुण्यातील राहत्या घरी आज दुःखद निधन झालं आहे. वयाच्या ९२ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. त्यांच्या निधनाने संगीतक्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. त्या किराणा घराण्यातील भारतीय शास्त्रीय गायिका होत्या. वयाच्या आठव्या वर्षी मित्राच्या सांगण्यावरून त्यांनी संगीताचे काही धडे घेतले. आणि तिथुनच प्रभा यांचा संगीतमय प्रवास सुरु झाला.
पहाटे झोपेत असताना प्रभा अत्रे यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यानंतर उपचारांसाठी त्यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र त्या आधीच त्यांचं निधन झाल होतं. प्रभा अत्रे यांचे नातेवाईक अमेरिकेत असल्याने ते भारतात आल्यावर त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
प्रभा अत्रे कोण होत्या?
ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांचा जन्म पुण्यात झाला आहे. वयाच्या आठव्या वर्षी त्या शास्त्रीय गायनाकडे वळल्या. संगीत शिकत असतानाच त्यांनी विज्ञान व कायदा विषयांत पदवी संपादन केली. नंतर त्यांनी संगीतात डॉक्टरेटही केली. प्रतिभावंत गायिका, संगीत रचनाकार, लेखिका, प्राध्यापिका व विदुषी म्हणून प्रभा अत्रे यांचा लौकिक होत्या.
११ पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम
गायकीसोबत ठुमरी, दादरा, गझल, उपशास्त्रीय संगीत, नाट्य संगीत, भजन व भावसंगीत गायकीवरही त्यांचे प्रभुत्व होते. ज्येष्ठ गायिका प्रभा अत्रे यांनी ११ पुस्तके प्रकाशित करण्याचा जागतिक विक्रम केला आहे. नवी दिल्लीत त्यांनी हिंदी आणि इंग्रजी भाषेत संगीतावरील ११ पुस्तकांचे प्रकाशन केले. प्रभा अत्रे या अग्रगण्य हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत गायिकांपैकी एक होत्या.