लोणी काळभोर : कोणताही पालक मुलांना व्यसने करायला सांगत नाही. मात्र मुले ही आपल्या परिसरातील व्यक्तींचे गुणधर्म अंगीकृत करीत असतात. त्याला चांगल्या किंवा वाईट गुणांची जाण नसते. जर एखादा पालक धुम्रपान करीत असेल तर मुलगा धुम्रपान करायला शिकतो. पालक मोबाईल खेळत असतील तर त्याला मोबाईलचे व्यसन लागते. त्यामुळे मुलांना व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे. असे प्रतिपादन लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी केले आहे.
लोणी काळभोर (ता. हवेली) येथील पृथ्वीराज कपूर हायस्कूल व ज्युनिअर कॉलेजमध्ये लोणी काळभोर पोलीस व येरवडा येथील मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने व्यसनमुक्ती जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन सोमवारी (ता.8) करण्यात आले होते. यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना वरील प्रतिपादन पोलीस उपनिरीक्षक विष्णू देशमुख यांनी केले. यावेळी प्राचार्य सीताराम गवळी, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे निशिकांत प्रधान, अनंत राम दरवेश, गोपनीय अंमलदार रामदास मेमाणे, रवी आहेर, जेष्ठ शिक्षिका शर्मिला साळुंखे, शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पुढे बोलताना विष्णू देशमुख म्हणाले की, व्यसन हा शारीरिक, मानसिक, कौटुंबिक आणि सामाजिक स्वरूपाचा आजार आहे. हा गुंतागुंतीचा व जन्मभराचा आजार असला तरी त्यावर नियंत्रण ठेवता येते. व्यसनाची मानसिक ओढ कमी करण्याचा, त्या ओढीवर मात करण्याचा प्रयत्न आपण करू शकतो. ती ओढ निर्माण होण्याची कारणे समजल्यास त्यावर मात करून माणूस वर्षानुवर्षे व्यसनापासून दूर राहू शकतो. असेही देशमुख यांनी सांगितले आहे.
आजचे विद्यार्थी हे देशाचे उज्ज्वल भवितव्य आहे. देशाचे भवितव्य हे व्यसनांमध्ये गुरफटलेले नसावे. तर वाचन, खेळ व अभ्यासामध्ये गुंतलेले असावे. मुलाला व्यसनाधीनतेपासून रोखण्यासाठी पालकांनीही लक्ष देणे अत्यंत महत्वाचे आहेत. तसेच पालकांनीही मुलाला व्यसनाचे दुष्परिणाम सांगून व्यसनापासून परावृत्त केले पाहिजे.
दरम्यान, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे निशिकांत प्रधान व अनंत राम दरवेश यांनी मुक्तांगणची उपचारपद्धती यावर विद्यार्थ्यांना विशेष मार्गदर्शन केले. विद्यालयात व्यसनमुक्ती प्रहरी गट स्थापन करण्यात आला आहे. यासमितीच्या प्रमुख शुभांगीनी धिमते व कल्पना बोरकर आहेत. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी मी व्यसनमुक्त राहील अशी शपथ घेतल्यानंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दयानंद जानराव यांनी केले. तर आभार पर्यवेक्षिका रेखा पाटील यांनी मानले.