शिक्रापूर, (पुणे) : शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत चारचाकी गाडीची काच फोडून 5 लाख 30 हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना घडली होती. वीस दिवस उलटूनहि शिक्रापूर पोलिसांकडून अजूनही तपास सुरु असल्याचे उत्तर फिर्यादींना मिळत आहे. सीसीटीव्हीत चोर दिसत असूनही पोलिसांकडून तपास करण्यात टाळाटाळ करीत असल्याचा आरोप फिर्यादीसह नातेवाईकांनी केला आहे. त्यामुळे पोलीस नक्की कसला तपास करतात असा सवाल नातेवाईकांसह नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी नयना निगडे या हडपसर परिसरात आपल्या कुटुंबीयांसोबत राहत असून जमिन खरेदी विक्रीचा व्यवसाय करतात. 28 मार्चला त्यांच्याकडे असलेल्या चारचाकी गाडीतून जमिन खरेदी विक्रीचे आलेले रोख रक्कम 5 लाख 30 हजार रुपये भरण्यासाठी शिक्रापूर येथील लाला अर्बन बँकेत भरण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी कामानिमित्त अॅड. मंदार पवार यांच्या कार्यालयात दुपारी तीन वाजता गेल्या होत्या. यावेळी त्यांच्याजवळ असलेल्या पर्समध्ये रोख रक्कम होती. ती त्यांनी गाडीत ठेवली व गाडी पवना सहकारी बँकेच्या पार्किंगमध्ये पार्क केली होती.
यावेळी ऑफीसच्या बाहेरुन विशाल हरिभाऊ गायकवाड यांच्याकडुन 5 लाख रुपये रोख रक्कम व गाडीतील 5 लाख 30 हजार रुपये असे एकुण 10 लाख 30 हजार रुपये घेवून शिक्रापूर येथील लाला अर्बन बँकेत भरणा करण्यासाठी निघाल्या होत्या. यावेळी गाडीच्या जवळ जाऊन पाहणी केली असता कारची ड्रायव्हर बाजुची काच फुटलेली दिसून आली. गाडीत ठेवलेली पैसे असलेली पर्स दिसून आली नाही. यावरून गाडीतील पैशाची चोरी झाल्याचे निष्पन्न झाले.
दरम्यान, याबबत शिक्रापूर पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक शिंदे करीत आहेत.
अद्यापही आरोपींचा शोध…
चोरीची घटणा घडून 20 दिवस उलटून गेले मात्र शिक्रापूर पोलिसांनी अजूनही आरोपींचा शोध घेतला नाही. दोन अज्ञात चोरटे हे दुचाकीवरून येऊन गाडीची काच फोडून रोख रकमेची पर्स चोरून घेऊन गेल्याचे सीसीटीव्हीत दिसून येत आहे. मात्र पोलिसांकडून अद्याप त्यांचा शोध लागला नाही. शिक्रापूर पोलिसांकडे चोरीच्या तपासाबाबत वारंवार विचारपूस केली असता चोरीचा तपास सुरु असल्याचे उत्तर मिळत आहे. याबाबत फिर्यादी व नातेवाईकांनी शिक्रापूर पोलिसांबाबत नाराजी व्यक्त केली आहे.