न्हावरे,ता 27: शिरूर-चौफूला महामार्गावर आंबळे(ता.शिरूर)येथील केसरी हॉटेल जवळ दुचाकी व टेम्पो यांच्यात समोरासमोर झालेल्या जोरदार धडकेत दुचाकीचालकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना गुरुवार(दि. 27)सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली. झालेल्या अपघातामध्ये आदेश बाळासाहेब भोईटे (वय- 30 वर्ष, रा.नागरगाव,ता.शिरूर,जि.पुणे) या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की,आदेश भोईटे हा तरुण जवळच असलेल्या रांजणगाव-कारेगाव औद्योगिक वसाहतीतून सायंकाळच्या वेळेस कामावरून दुचाकीने आपल्या घरी नागरगावकडे जात असताना वाटेत आंबळे गावाच्या जवळ भरधाव टेम्पोने भोईटे यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे या भीषण अपघातात आदेश भोईटे यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. मृत आदेश भोईटे याला शवविच्छेदनासाठी न्हावरे येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रविवारी(दि. 23 ) न्हावरे येथे भीषण अपघात होऊन, त्यामध्ये बाप-लेकीसह एका नातलगाचा मृत्यू झाला होता. ही घटना ताजी असताना, त्यानंतर चार दिवसांनी पुन्हा परिसरातील नागरगाव येथील कुटुंबातील एकुलत्या एका तरुण युवकाचा अपघातात मृत्यू झाल्यामुळे परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.घटनेचा पुढील तपास न्हावरे पोलिस करत आहेत.