पुणे : सारसबागेचा पत्ता विचारण्याचा बहाण्याने मोबाईल आणि पाकीट हिसकावण्याचा प्रयत्न करण्याचा प्रकार समोर आला आहे. रस्त्याने मोबाईल पहात निघालेल्या तरुणाला अडवून सारसबागेचा पत्ता विचारण्याचा बहाण्याने थांबवून त्याचा मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. तसेच त्याने विरोध करताच बहिणीला छेडतो का असं म्हणत मारहाण करून पाकीट पळवून नेण्यात आले. ही घटना नेहरू स्टेडियम ते अण्णा भाऊ साठे पुतळा या दरम्यान २१ एप्रिल रोजी दुपारच्या सुमारास घडली.
याप्रकरणी उदय सुनील जाधव (वय-२१, रा. सदाआनंद नगर, सोमवार पेठ) आणि विशाल हुसेनआप्पा शिरे (वय-२३, रा. म. फुले वाड्याजवळ, गंज पेठ) यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी ओम चंद्रकांत भोसले (वय-१९, रा. नरहरी कृपा अपार्टमेंट, विजयानगर कॉलनी, सदाशिव पेठ) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी ओम भोसले हे रविवारी दुपारी कामावरून घराकडे चालत निघाले होते. यावेळी ते मोबाईलमध्ये रील्स बघत बघत जात होते. त्यावेळी आरोपी मोटारसायकलवरुन आले आणि त्यांना सारसबाग कुठे आहे? अशी विचारणा केली. त्यांचे लक्ष विचलीत करून अचानक गाडीवर पाठीमागे बसलेल्या आरोपी जाधव याने त्यांच्या हातातील मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. फिर्यादीने हा मोबाईल घट्ट पकडून ठेवल्याने आरोपींना तो हिसकावता आला नाही.
तेथून पळ काढलेल्या आरोपींनी थोडे पुढे जाऊन मोटार सायकल बाजूला लावली. फिर्यादीकडे येऊन आरोपी शिरे याने तु माझ्या बहिणीचे छेड का काढली असं म्हणत त्यांच्याशी वाद घालायला सुरुवात केली. यावेळी आरोपी जाधवने रस्त्यावर पडलेला दगड उचलून फिर्यादीच्या डोक्यात मारून त्यांना जखमी केले. त्यांच्या खिशामधून जबरदस्तीने पाकिट काढून घेत तेथून पळ काढला. फिर्यादी यांनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. तसेच आरोपींचा गाडी क्रमांक दिला. पोलिसांनी त्यावरून आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे . पुढील तपास पोलीस करत आहेत.