पुणे: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता सरकारकडून स्वतःहून लाभ सोडण्यासाठी आवाहन केले जाणार आहे. सरकार स्थापन झाल्यापासून अर्ज बाद होणार असल्याची चर्चा सुरू आहे. परंतु, अद्याप थेट अर्ज बाद करण्याबाबत राज्याकडून जिल्हा प्रशासनाला सूचना देण्यात आलेल्या नाहीत. मात्र, स्वत:हुन जर कोणी लाभ सोडण्यासाठी अर्ज करत असेल, तर त्यांचा अर्ज वगळण्यासाठी प्रत्येक जिल्हाधिकारी यांच्या नावाने लॉगिन दिले जाणार असून, जिल्हापातळीवर नाव वगळण्याची सुविधा उपलब्ध केली जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात २१ लाख ११ हजार ९९१ बहिणींनी योजनेसाठी अर्ज केले होते. त्यापैकी २० लाख ८९ हजार ९४६ महिलांना योजनेचा लाभ मिळाला आहे. आचारसंहिता संपल्यानंतर थांबलेली अर्ज छाननी सुरू झाली. अर्ज छाननी झाली. लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता खात्यावर जमा झाला. त्यानंतर १८ डिसेंबरपासून अर्ज असलेले पोर्टल बंद करण्यात आले. त्याचे कुठलेही कारण जिल्हा प्रशासनाला राज्याकडून कळविण्यात आले नव्हते. १८ डिसेंबरला बंद केलेले पोर्टल सोमवारी (दि. १३) सुरू करण्यात आले आहे. मात्र, त्यावर नवीन अर्ज भरता येणार नाहीत, जिल्हाधिकारी यांच्या नावाने प्रत्येक जिल्ह्याला लॉगिन दिले जाणार असून, जी बहीण स्वतःहुन योजना नाकारेल, त्यांचा. अर्ज घेऊन जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिनवरून जिल्हापातळीवर संबंधित महिलेचे नाव वगळण्यात यावे, अशा सूचना सोमवारी (दि. १३) महिला व बालकल्याण विभागाचे सचिव डॉ. अनूप कुमार यादव यांनी दूरदृश्यप्रणालीद्वारे घेतलेल्या बैठकीत राज्यातील अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. याची अंमलबजावणी पुढील काही दिवसांमध्ये सुरू होण्याची शक्यता असल्याची माहिती सुत्रांनी दिली. तर, अर्ज थेट बाद करणे, तक्रार आल्यास अर्ज बाद करण्याच्या कुठल्याही सूचना बैठकीत देण्यात आलेल्या नाहीत.
पुणे जिल्ह्यातील दोन बहिणींनी नाकारला लाभ
ज्या बहिणीला लाभ घ्यायचा नसेल, त्यांना तालुक्यातील बाल विकास प्रकल्प अधिकारी (सीडीपीओ) किंवा जिल्हा परिषदेकडे लेखी अर्ज करावा लागणार आहे. त्यामध्ये योजनेचा अर्ज स्वतःहून सोडत असल्याचे लिहून द्यावे लागणार आहे. त्यानतर जिल्हाधिकाऱ्यांच्या लॉगिनवरून आलेल्या अर्जातील नावे वगळण्याची प्रक्रिया होणार आहे. पुणे जिल्ह्यात यापूर्वीच दोन बहिणीनी स्वतः हुन योजनेचा लाभ नाकारत असल्याचा अर्ज प्रशासनाला पाठवला आहे.