लोणी काळभोर : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून हातभट्टीची दारू विक्री करण्यासाठी निघालेल्या दोघांना लोणी काळभोर पोलिसांनी अटक केली आहे. ही कारवाई पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बारा फाटा परिसरात सोमवारी (ता.17) रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास केली आहे. या कारवाईत पोलिसांना 57 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात यश आले आहे.
रोहित भागवत शिंदे (वय 20) व महादेव अनंता पवार (वय 37, दोघेही रा. जनता वसाहत, पर्वती, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहे. याप्रकरणी पोलीस अंमलदार प्रशांत सुतार यांनी सरकारच्या वतीने लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस अंमलदार प्रशांत सुतार हे लोणी काळभोर पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. सुतार हे नेहमीप्रमाणे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास गस्त घालत होते. गस्त घालत असताना, पोलिसांना पुणे-सोलापूर महामार्गावरून अवैध हातभट्टी दारूची वाहतूक होणार आहे, अशी माहिती एका खबऱ्यामार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी कुंजीरवाडी (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील बारा फाटा परिसरात सापळा रचला. तेव्हा पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून पुण्याच्या दिशेने जाणारी एक दुचाकी पकडली. त्या दुचाकीस्वारांच्या कॅनमध्ये 70 लिटर हातभट्टी दारू आढळून आली. पोलिसांनी या कारवाईत 7 हजार रुपयांची दारू व 50 हजार रुपयांची दुचाकी असा 57 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर आरोपी रोहित शिंदे व महादेव पवार याला अटक करून त्यांच्याविरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात मुंबई प्रोव्हीजन कलम 65 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कामगिरी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल घोडके, पोलीस हवालदार चंद्रकांत माने, विजय जाधव, विशाल बनकर, निलेश कोल्हे, पोलीस अंमलदार प्रशांत सुतार व त्यांच्या सहकाऱ्यांनी केली आहे.