उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचनसह परिसरातील कोरेगाव मूळ, टिळेकरवाडी, शिंदवणे, खेडेकर मळा, बिवरी, हिंगणगाव व राजेवाडी परिसरात बिबट्यांचा धुमाकूळ सुरू आहे. वन विभाग बिबट्याकडे दुर्लक्ष करत असल्याने परिसरातील शेतकरी त्रस्त झाले असून, त्यांच्यामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा खुलेआम वावर असल्याचे वनविभागाला माहिती असूनही वनविभाग मात्र अजूनही झोपेचे सोंग घेत बिबट्याला जेरबंद करण्यात अपयशी ठरला आहे. मागील पंधरा दिवसांत गाईचे वासरु, शेळ्या, मेंढ्या, भटकी कुत्री अशा विविध जनावरांचा बिबट्याने फडशा पाडला असून, परिसरात बिबट्याचे हल्ले काही थांबेना आणि वनविभाग काही पिंजरा लावेना, अशी म्हणण्याची वेळ परिसरातील शेतकऱ्यांवर आली आहे.
पूर्व हवेली परिसरात बिबट्याची दहशत वाढली आहे. बिबट्याचे हल्ले होत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी देखील वनविभाग याकडे कानाडोळा करताना दिसत आहे. पिंजरा लावण्याची मागणी करून देखील पिंजरा लावण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
पिंजरे नेमके आहेत तरी कुठे?
बिबट्याने परिसरातील गावांच्या आखाड्यावरील पाळीव जनावरे फस्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. हिंगणगाव येथील हनुमंत दत्तात्रय कोतवाल व जनावरांचे डॉ. रणजी कोळपे यांच्या गोठ्यातील वासरांवर बिबट्याने हल्ला केला होता. यामध्ये डॉ. कोळपे यांचे वासरू ठार मारले होते. औपचारिक पंचनामे करून वनविभागाने शेतकऱ्यांना फक्त गोंजारले आहे. बिबट्याला जेरबंद करणे वनविभागाचे कर्तव्य असताना पिंजरे नेमके कुठे आहेत? हा संशोधनाचा विषय असून, आज बिबट्यामुळे शेतकरी त्रस्त असल्याने वनविभाग मात्र हातावर हात धरून बसलेले आहे.
वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळे बिबट्याचा मुक्त संचार
कोरेगाव मूळ ते बिवरी या गर्दीच्या ठिकाणांवरून रस्ता ओलांडताना बिबट्या दिसून आला आहे. यावेळी काही नागरिकांनी त्याचे व्हिडिओ व फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. आजूबाजूच्या परिसरातील शेतकरी चिंताग्रस्त आहे. वनविभागाच्या बेजबाबदारपणामुळे बिबट्याचा मुक्त संचार असून, शेतकऱ्यांची जनावरे फस्त करत सुटल्याने परिसरातील शेतकऱ्यांवर संकट निर्माण झाले आहे.
पिकांना पाणी देताही येईना…
पूर्व हवेलीतील उरुळी कांचन, वळती, तरडे, शिंदवणे कोरेगाव मुळसह परिसरात बिबट्या दाखल झाल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले. मेंढपाळ व पशूपालन करणाऱ्यांना डोंगरावर गुरे-ढोरे चारण्यासाठी घेऊन जाणे कठीण झाले आहे. तसेच बिबट्याच्या भीतीने रात्रीचे पिकांना पाणी देणे अशक्य झाल्याने पिकांना पाणी असूनही पाणी देता येत नाही.
शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण…
या भागातील अनेक शेतकरी उपजीविकेसाठी शेळ्या-मेंढ्या पाळतात. त्यांच्यामध्ये देखील भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर शेतमजूर कामाला बाहेर पडत नसल्याची वस्तुस्थिती आहे. तसेच स्थानिक नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न उभा राहिला आहे. वनविभागाला बिबट्याला जेरबंद करण्याचे गांभीर्य नसल्याने वनविभागाची अकार्यक्षमता नागरिकांच्या जीवावर बेतण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
परिसरातील शेतकरी, नागरिकांनी सतर्क राहावे
याबाबत बोलताना पूर्व हवेलीतील वनपरिमंडळ अधिकारी मंगेश सपकाळे म्हणाले, “पूर्व हवेलीत बिबट्याचे दर्शन होत असून, त्याचे हल्ले वाढले आहेत. पिंजरा बसविण्यासाठी आम्हाला नागपूर येथील विभागाकडून परवानगी घ्यावी लागते. तसेच नुकसान झालेल्या शेतकऱ्यांचा पंचनामा करून त्यांना नुकसान भरपाई देण्यात येते. याबाबत परिसरातील शेतकरी व नागरिकांना खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.”