दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : दसऱ्यासाठी झेंडूची फुले आणि इतर साहित्याची खरेदी करून घरी निघालेल्या दूचाकीस्वाराला पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने जोरदार धडक दिल्याने दूचाकीचालक दशरथ मारुती चोरमले (वय अंदाजे ५० वर्षे, रा. काळके वस्ती, गलांडवाडी नं. १, ता. इंदापूर) यांचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना मंगळवारी (ता. २४) सकाळी १० वाजण्याच्या सुमारास इंदापूरनजीक पुणे-सोलापूर महामार्गावरील दुर्गेश्वरी हॉटेल आणि चैतन्य हॉटेलच्या दरम्यान घडली. ऐन दसऱ्यादिवशी ही दुर्दैवी घटना घडल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, दशरथ चोरमले नेहमीप्रमाणे सकाळी दूध विक्री करण्यासाठी इंदापूर शहरात आले होते. दूध विक्री करून, तथा दसरा साजरा करण्यासाठी फुले व आवश्यक वस्तू घेऊन ते आपल्या दुचाकीवरून (एम एच ४२ सी ५६०४) घरी निघाले होते. (Indapur News ) त्यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने (एम एच ३२ ए जे ९२७३) त्यांना चिरडले. हा अपघात एवढा भयानक होता की, दुचाकीस्वाराच्या मेंदूसह शरीराचे अवयव घटनास्थळी अक्षरशः विखुरले होते. अपघातानंतर त्यांनी खरेदी केलेल्या वस्तूही रस्त्यावर विखुरल्या होत्या. या घटनेनंतर ट्रकचालक पसार झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
दरम्यान, घटनेनंतर घटनास्थळी १५०-२०० नागरिक जमा झाले. या वेळी संतप्त झालेल्या जमावाने ट्रक पेटवून दिला. इंदापूर पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (Indapur News ) त्यानंतर इंदापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन व कर्मयोगी शंकररावजी पाटील साखर कारखान्याने अग्निशमन गाडी पाचारण केली. अग्निशमन दलाने काही वेळातच ही आग आटोक्यात आणली. मात्र, या आगीत ट्रकचे मोठे नुकसान झाले.
राजवर्धन पाटील यांनी केले चोरमले कुटुंबाचे सांत्वन
अपघाताच्या दुर्दैवी घटनेमुळे चोरमले कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच भाजप युवा मोर्चा कोअर कमिटीचे प्रमुख व निरा भिमा सहकारी साखर कारखान्याचे संचालक राजवर्धन हर्षवर्धन पाटील यांनी या कुटुंबाची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. (Indapur News ) मृत्यूसाठी जबाबदार असणाऱ्या आरोपीला मोठी शिक्षा झाली पाहिजे, असे ते या वेळी म्हणाले. राजवर्धन पाटील म्हणाले की, सण व उत्सवाच्या काळात चोरमले कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या दुःखातून सावरण्याची शक्ती परमेश्वराने या कुटुंबाला द्यावी.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : मायलेकींचा राहत्या घरात संशयास्पद मृत्यू ; पतीला नातेवाईकांना दिला चोप