लोणी काळभोर, (पुणे) : येथील एंजेल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये इयत्ता 8 वीच्या वर्गात शिकणाऱ्या एका मुलाला 9 वीतील 15 ते 20 जणांनी वॉशरूममध्ये ओढत नेहून जबर मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच, आज गुरुवारी (ता. 24) सकाळी सव्वा आठ वाजण्याच्या सुमारास शाळेच्या बसमधून शाळेच्या परिसरात उतरलेल्या एका मुलाला तिघांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे.
या घटनेमुळे विद्यार्थ्यांमध्ये भीतीचे तर पालकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे. यामुळे शाळेतील मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळेतील मुलांची सुरक्षा ही व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. ती जबाबदारी योग्य व्यक्तींना नेमून द्यावी लागते. मात्र या शाळेत कोणीही जबाबदारी घेण्यास पुढाकार घेत नसल्याची माहिती पुढे आली आहे.
विद्यालयात काल बुधवारी झालेल्या हाणामारीच्या घटनेची गंभीर दखल शाळा प्रशासनाने घेतली नाही का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जर दखल घेतली असेल तर दुसऱ्याच दिवशी पुन्हा सकाळीच आणखी मुलांमध्ये भांडणे कशी काय झाली. एंजेल हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमध्ये वारंवार होत असलेली भांडणे व वाढत चाललेल्या तक्रारी यामुळे शाळेविषयी विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये नकारात्मकता उमटली आहे.
शाळेच्या तक्रारीत वाढ…
एंजेल हायस्कूल व महाविद्यालय वारंवार कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असते. मुलांनी फी न भरल्याने एका वर्गात मुलांना कोंडून ठेवण्यात आले होते. या अगोदरही शाळेत हाणामारी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांची सुरक्षा देखील अत्यंत महत्त्वाची आहे. यासाठीच्या उपाय योजनांसंदर्भात शासनस्तरावरून वेळोवेळी आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. मात्र, शाळा प्रशासन व येथील शिक्षक तसेच कर्मचारी हे आदेश पाळत नसून यांना कोणाचाही धाक राहिला नसल्याचा आरोप पालक व नागरिक करू लागले आहेत.
याबाबत शाळेच्या प्राचार्या शमशाद कोतवाल यांच्याशी फोनवरून संपर्क साधला असता संपर्क होऊ शकला नाही.