बापू मुळीक / सासवड : पुरंदर तालुक्यातील तहसील कार्यालयातंर्गत येणाऱ्या पुरवठा विभागात सध्या एजंटांचा सुळसुळाट झाला आहे. हे एजंट नागरिकांना कार्यालयाच्या बाहेरच गाठून गोड बोलून व शासकीय कामाची भीती दाखवत आपला कार्यभाग साधत आहेत. नवीन केशरी कार्डसाठी शासकीय फी २० रुपये असून त्यासाठी तब्बल ६ ते ९ हजार रुपये सामान्य नागरिकाकडून उकळत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे संबंधितांवर कडक कारवाई करण्याची मागणी प्रहार अपंग क्रांती संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.
यासाठी पुरंदर मधील शेतकरी योगेश मुळीक यांनी यावर कडक कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. पुरंदर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या शेत पिकाला बाजार भाव मिळाला नाही, शेतकरी कर्जबाजारी आहे, त्यांच्याकडे पैसा शिल्लक नाही, यासाठी कर्ज, नुकसान भरपाई आदी प्रकरणासाठी रेशन कार्ड ची मागणी असते. तेव्हा रेशन कार्ड काढण्यासाठी किंवा त्या दुरुस्तीसाठी या विभागात यावे लागते.
तर येथे पोहोचताच एजंट या शेतकऱ्यांना गाठून आपल्या कार्यभाग साधत असतात. त्यामुळे हे एजंटांचे चांगलेच काम चालू असताना यावर अधिकारी काय करत असतात. हेच समजत नाही. यावर चांगलाच काना डोळा अधिकाऱ्यांचा दिसून येत आहे. यासाठी पुरवठा विभागातील गैरप्रकारांना आळा न घातल्यास यावर तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शेतकरी योगेश मुळीक यांनी दिला आहे.