पुणे : खासगीकरणाचा घाट घालणाऱ्या पुणे महानगरपालिकेने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोट या मोबदल्याच्या स्वरूपात शहरातील डीपी रस्ते व पूल खासगी सहभागातून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुणे महानगरपालिकेत लोकप्रतिनिधी समिती नसल्यामुळे अनेक निर्णय हे प्रशासनाकडून घेतले जात आहेत. त्यात मालिकेच्या धोरणातच विरोधात निर्णय घेतले जात असल्याचा आरोप केला जात आहे. त्यानुसार महंमदवाडी येथील सर्व्हे नंबर १६ आणि ८ पार्ट मध्ये २४ मीटर डीपी रस्ता करणे, उंड्री सर्व्हे नंबर २०, २२, २६ ते हांडेवाडी सर्व्हे नंबर १, २, ६ या दरम्यानचा २४ मीटर आर. पी. रस्ता पीपीपी तत्त्वावर विकसित करण्यात येणार आहे. त्यासाठी ८८ कोटी ८३ लाख रुपये अंदाजे खर्च असून, याबाबतचा प्रस्तावाला स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
वाहतूक कोंडीच्या पार्श्वभूमीवर विकास आराखड्यातील रस्ते प्राधान्य तत्त्वावर हाती घेण्यात आले आहेत. त्यासाठी पुणे महापालिकेने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोट या मोबदल्याच्या स्वरूपात शहरातील डीपी रस्ते व पूल खासगी सहभागातून विकसित करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानुसार शहरातील सात डीपी रस्ते, दोन उड्डाणपुलांची कामे पीपीपी धर्तीवर हाती घेण्यात आलेली आहेत.