पुणे : शहरातील कोरेगाव पार्क, वडगावशेरी, पापडेवस्ती, हडपसर परिसरातील बंद सदनिका फोडून, रोकड, सोन्याचे दागिने असा ९ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्या विरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेलर रोड कोरेगाव पार्क येथील आतूर पार्कमधील एका सदनिकेतून चोरट्यांनी ३ लाख ५० हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी अमित सतपाल कोचर (वय-५८) यांनी कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. १२ डिसेंबर रोजी रात्री फिर्यादी सदनिकेत झोपले होते.
चोरट्यांनी पहिल्या मजल्यावरील उघड्या खिडकीद्वारे आत प्रवेश करून सोने-चांदीचे दागिने आणि रोकड असा ऐवज चोरी केला. तसेच, फिर्यादींच्या सदनिकेच्या शेजारी असलेल्या गुप्ता आणि रायचंद ग्रुप ऑफ कंपनीच्या ऑफिसमध्ये देखील चोरीचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
तर सोमनाथनगर वडगावशेरी येथील ५० वर्षीय महिलेच्या सदनिकेतून चोरट्यांनी ५ लाख ४७ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. १२ डिसेंबरच्या रात्रीच ही घटना घडली आहे. याप्रकरणी महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादींची सदनिका बंद असताना चोरट्यांनी कडीकोयंडा उचकटून चोरी केली. फिर्यादींना चोरीचा प्रकार समजताच, त्यांनी पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.
वडगावशेरी येथील गणेशनगरमधील २९ वर्षीय महिलेच्या सदनिकेतून मोबाईल आणि सोन्याची अंगठी असा २१ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला आहे. पापडेवस्ती हडपसर येथील रितेश भिमरावजी पिसे (वय ३७) यांच्या सदनिकेतून चोरट्यांनी ५० हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी रितेश यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.