बीड: धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर गढी पुलावर एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. रात्री उशिरा वेगाने येणाऱ्या ट्रकने उभ्या असलेल्या 6 जणांना चिरडले, चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार आधी दुभाजकाला धडकली होती. कारचे किती नुकसान झाले हे पाहण्यासाठी 6 जण कारच्या खाली उतरले होते.

दरम्यान, मागून आलेल्या भरधाव ट्रकने 6 जणांना चिरडले. धडक इतकी जोरदार होती की, सगळे काही फूट दूर फेकले गेले होते. या अपघातात बाळू अतकरे, मनोज कारंडे, कृष्णा जाधव, दीपक सरोया, भागवत परळकर आणि सचिन ननावरे असे मृतांचे नाव आहे. अपघातात एका जण गंभीर जखमी झाला असून जखमी व्यक्तीवर सध्या उपचार सुरू आहेत. मात्र सहा जणांच्या अपघाती निधनाने गेवराई परिसरात शोककळा पसरली आहे.

अपघातानंतर घटनास्थळावरून पळून गेलेल्या ट्रक चालकाचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलिस करत आहेत. अपघाताच्या बातमीने परिसरात शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेमुळे धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील रस्ते सुरक्षेबाबत चिंता निर्माण झाली आहे. पहिल्यांदा झालेल्या अपघातामधून वाचले पण त्यानंतर मात्र काळाने घाला घातलाच. या अपघातामध्ये सहा जणांना आपला जीव गमवावा लागला आहे.







