नाशिक: नाशिकमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे एका महिलेने आरोप केला आहे की, तिच्या सासरच्या कुटुंबाने तिला घरीच गर्भपात करण्यास भाग पाडले. सात वर्षांपूर्वी महिलेने भूपेश पाठकशी आंतरजातीय विवाह केला होता. दरम्यान, याचाच राग सासरच्या लोकांच्या मनात आहे. या कृत्यात महिलेचा पती, तिचे सासू, सासरे आणि नणंद यांचा समावेश आहे. आंतरजातीय विवाह केल्यामुळेच सासरची लोक महिलेचा छळ करत होती. धक्कादायक बाब म्हणजे, पती भूपेश पाठक देखील लग्नानंतर ‘खालच्या जातीची आहे’, असं सांगत पत्नीसोबत राहण्यास तयार नव्हता.

दरम्यान, गर्भवती असलेल्या महिलेच्या नर्स असलेल्या सासूने घरातच सुनेचा गर्भपात केले. या अमानुष कृत्यामुळे समाजात तीव्र संताप व्यक्त होत आहे. या प्रकरणी महिलेने नाशिकमधील आडगाव पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे आणि पोलिसांनी तिचा पती भूपेश पाठक, तिची सासू सुचित्रा पाठक, तिचे सासरे प्रवीण पाठक आणि नणंद स्मिता पाठक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे समाजात संतापाची लाट उसळली आहे, अनेकांनी आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. “हा घरगुती हिंसाचाराचा गंभीर प्रकार आहे,” असे अनेकांनी म्हंटले आहे. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे आणि पोलिस पुरावे गोळा करण्यासाठी आणि महिलेला न्याय मिळवून देण्यासाठी काम करत आहेत.








