पुणे : नाशिक येथील आदिवासी विकास व शबरी महामंडळातील 584 पदांच्या नोकरभरतीत दोषी आढळलेल्या पुण्यातील कुणाल आयटी सर्व्हिसेस या कंपनीला विभागाने काळ्या यादीत टाकले असल्याची माहिती समोर आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, आदिवासी विकास महामंडळ व शबरी वित्त व विकास महामंडळाने 2016 मध्ये भरती प्रक्रिया राबवली होती. विभागाने सरकारमान्य संस्था सोडून पुण्यातील खासगी कुणाल आयटी सर्व्हिसेस संस्थेकडून नोकर भरती करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या टप्प्यात 361 पदांसाठी भरतीप्रक्रिया राबविली होती. त्यासाठी तब्बल 36 हजार उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. परंतु, तत्कालीन अधिकारी आणि कंपनीने या नोकरभरतीत घोटाळा केला.यात महामंडळाचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक बाजीराव जाधव, प्रशासन अधिकारी नरेंद्र मांदळे यांच्यासह कुणाल आयटी यांचाही सहभाग आढळला होता. महामंडळाच्या लीना बनसोड यांनी याबाबत आदिवासी विभागाकडे पाठपुरावा केला. तसेच संबधित कंपनीला काळ्या यादीत पाठविण्याचा प्रस्ताव दिला होता. त्यानंतर सरकारने या कंपनीला काळ्या यादीत टाकत, मोठा दणका दिला आहे.

दरम्यान या घोटाळ्याप्रकरणी आदिवासी विकास महामंडळाचे तत्कालीन महाव्यवस्थापक नरेंद्र मांदळे, चौकशी अधिकारी तथा तत्कालीन अपर आयुक्त अशोक लोखंडे या दोन बड्या अधिकाऱ्यांसह कुणाल आयटीचे संचालक संतोष कोल्हे याच्याविरुद्ध गुन्हे देखील दाखल झाले आहेत.







