शिरूर,ता. 27: शिरूर शहरातील गुजरमळा येथील एका बंद घराचे कुलूप व कडी तोडून अज्ञात चोरट्याने 62 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लंपास केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माधुरी नारायण तरटे (वय 35, व्यवसाय-नोकरी,रा.गुजरमळा-शिरूर, ता.शिरूर,जि.पुणे) यांनी शिरूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी (ता.24) सकाळपासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत तरटे यांच्या घरात कोणीही नव्हते. यावेळेत अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराची कडी तोडून घरात प्रवेश केला. त्यानंतर घरात ठेवलेल्या 42 हजार रुपये किमतीच्या दोन सोन्याच्या कानातील रिंग व 20 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी असा सोन्याचा साडेसात ग्रॅम वजन असलेले सुमारे 62 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे.
या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक श्रीशैल चिवडशेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली शिरूर पोलीस करीत आहेत.
शहरात अशा प्रकारच्या चोरीच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांकडून चोरट्यांचा तातडीने शोध घेण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून होत आहे.







